जे घरात थांबणार नाहीत, ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील- अजित पवार
Deputy Chief Minister Ajit Pawar | (Photo Credits : Facebook)

लोकांना वारंवार सांगूनही लोक लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात घराबाहेर सर्रासपणे फिरताना दिसत आहे. लोकांच्या या बेजबाबदार वागण्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावा लागत असून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे गंभीर चित्र पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी नागरिकांना पुन्हा एकदा कडक शब्दांत खडे बोल सुनावले आहेत. 'जे घरात थांबणार नाही ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील' अशा शब्दांत नागरिकांना चेतावणी दिली आहे. तसेच भाजी मार्केटमध्ये दिसणारी गर्दी ही तुमच्या आरोग्यास धोका पोहोचविण्याची लक्षणे आहेत असेही त्यांनी सांगितले आहेत.

राज्यात लॉकडाऊन असताना लोकांना अजून या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. त्यामुळे पोलिसांनीही आता पोलिसी खाक्या दाखवायला सुरुवात केलेली आहे. कोरोनापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर 'होम क्वारंटाईन' अथवा 'हॉस्पिटल क्वारंटाईन' असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे स्वत:चे आणि स्वत:च्या कुटूंबाचे संरक्षण करायचे असेल तर घरात बसा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. दिल्लीतील निझामुद्दीन येथे जो प्रकार घडला, असे महाराष्ट्रात घडू देऊ नका; राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे राज्यातील जनतेला आवाहन

“राज्य शासनाने आवाहन केल्यानंतर अनेक खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने, हॉस्पिटल सुरु केले आहेत, परंतु ज्यांनी त्यांचे दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत त्यांची नोंद राज्य शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल,” असेही ते म्हणाले आहेत.

त्याचबरोबर राज्यात अन्नधान्याचा मुबलक साठा आहे, त्यामुळे विनाकारण घरात साठा करण्यासाठी घराबाहेर पडून गर्दी वाढवू नका. 'मरकज' च्या घटनेपासून धडा घ्या, असे आवाहनही नागरिकांना केले आहे.