हिरानंदानी रुग्णालयातील रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे नव्हेतर, मधुमेह आणि आस्थमामुळे झाला; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
Rajesh Tope | Photo Credits: Twitter/ ANI

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातला आहे. आतापर्यंत राज्यात 97 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच 13 मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालेल्या एका 59 वर्षीय नागरिकाचा रविवारी हिरानंदानी रुग्णालयात (Hiranandani Hospital) मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली होती. मात्र, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज दिलेल्या माहितीने सर्वांचे लक्ष आकर्षित करुन घेतले आहे. हिरानंदानी रुग्णालयातील रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे नव्हेतर, मधुमेह आणि आस्थमामुळे झाला आहे, असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याने मृत्यू होतो, असा गैरसमज अनेकांच्या मनात होता. कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. सध्या 170 हून अधिक देश कोरोना व्हायरसशी झुंज देत आहे.

नुकतेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक ट्वीट केले आहे. टोपे ट्वीटच्या माध्यमातून म्हणाले की, काल रात्री हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णाचा कोरोना हा आजार बरा झाला होता तथापि त्याला असलेल्या मधुमेह व अस्थमा या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत त्याचा मृत्यू झाला.त्याचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, अशा आशायाचे ट्वीट टोपे यांनी केले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: पुण्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त दाम्पत्याची टेस्ट निगेटिव्ह; नागरिकांना दिलासा

ट्वीट-

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड मनपा– 12, पुणे मनपा– 15, मुंबई– 42, नागपूर– 4, सांगली- 4, यवतमाळ– 4, नवी मुंबई– 4, कल्याण– 4, अहमदनगर– 2, रायगड– 1, ठाणे– 1, उल्हासनगर– 1, औरंगाबाद– 1, रत्नागिरी– 1, सातारा - 1 रुग्ण आढळले आहेत.

कोरोना व्हायरसच्या संक्रमित रुग्णांची वाढती संख्या सर्वांचीच चिंता वाढवत आहे. अशात सर्वांना दिलासा देणारी एक बातमी आली आहे. महाराष्ट्रातील पहिले कोरोना बाधित पती पत्नीची टेस्ट आता निगेटिव्ह आली आहे. उद्या पुन्हा एकदा त्यांचे सॅपल्स टेस्टिंगसाठी पाठवले जातील. ते देखील निगेटिव्ह आल्यास या दोघांना सर्व सोपस्कार पुर्ण करून घरी सोडण्यात येईल. त्यामुळे एकीकडे कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना हा आजार पूर्णपणे बरा होणारा आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. याअगोदर औरंगाबादमधील एक महिला ठणठणीत बरी झाली आहे.