Ajit Pawar (PC - Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यातच बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतल्याची माहिती समोर आली. ज्यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले मत मांडले आहे. याप्रकरणात धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाची मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत.

"धनंजय मुंडे यांच्याबाबत जे काही घडले होते, त्यामध्ये आम्ही त्यांना पाठीशी घालत आहोत असे आमच्यावर आरोप झाले होते. आम्ही संपूर्ण तपास होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या, असे म्हणत होतो. यातच महिलेने तक्रार मागे घेतल्याची माहिती समोर आली. दरम्यान, धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाची मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. अशा आरोपामुळे त्या लोकांची बदनामी होते. विरोधक या विषयाचा मुद्दा करतात. बहुजन समाजातून आलेल्या नेत्यांना त्रास झाला. धनंजय मुंडे यांना भयंकर त्रास झाला. पक्षाला सुद्धा याचा त्रास झाला. यापूर्वी राष्ट्रवादी युवकांची सुद्धा बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, काही तथ्य समोर आले नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- MNS Leader Akhil Chitre Arrested: मनसे नेते अखिल चित्रे यांना अटक; अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप

संबंधित महिलेने गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. याच मुद्द्यावरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. तसेच त्यांनी राजीनामा द्याव, अशा मागणींनीदेखील जोर धरला होता.