मुंबईमधील धोकादायक पुलांची पुनर्बांधणी ताबडतोब करावी; आयआयटी मुंबईचा सल्ला
अंधेरी पूल (Photo Credits: Railways)

अंधेरी येथील गोखले उड्डाणपुलावरील पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर रेल्वे प्रशासन सावध झाले. रेल्वेने मुंबई उपनगरीय मार्गावरील पादचारी पूल, उड्डाणपुलांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. आयआयटी, मुंबईच्या मदतीने हे सर्वेक्षण पार पडले आणि आता 5 धोकादायक उड्डाणपुलांची दुरुस्ती हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे हद्दीतील लोअर परळ स्थानकाला लागूनच असलेला उड्डाणपूल अधिक धोकादायक असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे त्याचे काम आधी हाती घेण्यात आले. त्यानंतर आता दादर येथील टिळक उड्डाणपूल, प्रभादेवी येथील कॅरोल पुलासह अन्य तीन पूल असून पुनर्बाधणीच्या कामासाठी प्रथम सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.

मुंबईमध्ये अनेक पूल हे ब्रिटीशकालीन आहेत, या पुलांची डागडुजी अनेक वर्षे केली गेली नाही. याबाबत 2 वर्षांपूर्वी एक सर्व्हे घेण्यात आला होता मात्र पुढे काहीच झाले नाही. अखेर आता धोकादायक पुलांची दुरुस्ती आणि नवीन पूल बांधण्याचे काम सुरू होत आहे. यासाठी तब्बल सहाशे कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये काही नवीन पूल देखील बनाढले जाणार आहेत, ज्यात महालक्ष्मी येथे पूल, मालाड इन्फिनिटी मॉल, अंधेरी लोखंडवाला ते मालाडला जोडणारा उन्नत मार्ग, अंधेरी येथे आणखी एक पूल, कमल अमरोही स्टुडियोजवळ जोगेश्वरीच्या दक्षिण दिशेला पूल बांधण्यात येणार आहे.

सध्या लोअर परळ उड्डाणपुलाचे पाडकाम पूर्ण झाले असून वर्षभराच्या आतच त्याचीही उभारणी केली जाईल. त्यानंतर आता या पाच पुलंच्या डागडुजीची तयारी केली जाणार आहे. यासाठी एक विशेष सल्लागार समिती स्थापन केली जाणार आहे, तसेच ट्राफिक आणि वाहतुकीचाही नव्याने विचार केला जाणार आहे.