महाराष्ट्रातील पर्यावरणात (Weather Alert Maharashtra) पुढचे दोन दिवस काही बदल जाणवतील. राज्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी ही पर्जन्यवृष्टी होईल असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. गेल्या काही काळापासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढतो आहे. त्यासोबत उकाडाही वाढला आहे. तापमानांच्या नोंदी पाहता उच्चांक प्रस्तापीत होत आहेत. त्यात पावसाचा थोडा शिडकाव झाला तर दिलासा मिळू शकतो.
पुणे वेधशाळेने माहिती देताना सांगितले की, पश्चिम बंगाल आणि झारखंड आदी राज्यांमध्ये हवेची स्थिती काहीशी चक्रीय पद्धतीची पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील पर्यावरणात बदल होण्याची चिन्हे आहेत. पुढच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात ढगांची दाटी पाहायला मिळू शकते.
दरम्यान, नागपूर वेशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, नजिकच्या काळात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भात साधारण 9 ते 11 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. असे असले तरी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाटही येऊ शकते. दरम्यान पर्यावरणात मोठे बदल झाले तर विदर्भात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. 9, 10 आणि 11 तारखेला अनुक्रमे पूर्व विदर्भा आणि संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्यानं पश्चिम बंगाल, कर्नाटक, सिक्कीम, अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम या राज्यांमध्ये येत्या 24 तासांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. झारखंडमध्ये येत्या दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.