Bhagat Singh Koshyari | (Photo Credit : ANI)

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे आधीच वादात सापडलेले महाराष्ट्राचे राज्यपाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना श्रद्धांजली वाहिली. मात्र राज्यपालांनी श्रद्धांजली वाहताना त्यांची चप्पल काढली नाही.

राज्यपालांनी अशा प्रकारे श्रद्धांजली वाहणे हा काँग्रेसने हुतात्म्यांना अपमान म्हटले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावत यांनी राज्यपालांचा चप्पल घालून श्रद्धांजली वाहण्याचा व्हिडिओ ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते.’

श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या चपला काढल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चप्पल काढून श्रद्धांजली वाहिली. मात्र राज्यपालांनी तसे न केल्याने राज्यात त्यांच्या नावावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळचे आदर्श आहेत, आजचे आदर्श गडकरी आहेत. (हेही वाचा: मुंबई २६/११ च्या दहशतवादी हल्लेखोरांना शिक्षा झालीचं पाहिजे, न्याय करण्यासाठी भारत सरकार कटीबध्द: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर)

त्यावर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बाप हा बापच असतो. नवीन काय आणि जुनं काय? असे म्हटले होते. यासह अॅमेझॉनवरून आलेले कोश्यारी नावाचे हे पार्सल दिल्लीला परत पाठवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. केंद्र सरकारने राज्यपालांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली, अन्यथा महाराष्ट्र बंदचे संकेत दिले. त्यांच्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीही आक्रमक आहेत. भाजपच्या नेत्यांनीही त्यांना विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला आहे.