Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस निवडणूक खर्चातून उरलेली 20 लाख रुपयांची रक्कम दिली मुख्यमंत्री सहायता निधीला
Urmila Matondkar | (Photo Credits: Facebook)

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Actor Urmila Matondkar) यांनी 20 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहेत. उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी नुकताच शिवसेना पक्षात प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक 2019 लढवली होती. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीकडून (Maharashtra Pradesh Congress Committee) मातोंडकर यांना 50 लाख रुपये इतकी रक्कम निवडणूक निधी म्हणून दिली होती. त्यातील खर्चून उरलेली 20 लाख रुपयांची रक्कम मातोंडकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे. मातोंडकर यांनी ही रक्कम जुलै 2020 मध्ये दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हा निधी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची अनुमती होती. त्यांच्या अनुमतीनेच हा निधी पुढे देण्यात आला. हवे तर आपण त्याची पुष्टी करु शकता असेही मातोंडकर यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सध्या त्यांचे नाव विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून राज्य मंत्रिमंडळाने सूचवले आहे. परंतू, राज्यपलांनी अद्याप कोणताच निर्णय न घेतल्याने त्यांची निवड विधानपरिषदेवर होणे अद्याप प्रलंबित आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडूक लढवली होती. या वेळी त्यांच्यात आणि भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यात जोरदार लढत झाली. यात मातोंडकर यांचा पराभव झाला. तर, शेट्टी हे मताधिक्याने विजयी झाले. (हेही वाचा, Kangana Ranaut On Urmila Matondkar: कंगना रनौत हिची पुन्हा एकदा उर्मिला मातोंडकर हिच्यावर टीका, जाणून घ्या नव्या वादाचे कारण)

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी निवडणूक नियमांनुसार काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी अशोक सूत्राळे यांच्यासह बँक ऑफ बडोदा शाखा कांदिवली येथे एक संयुक्त खाते उघडले. त्यानंतर एमपीसीसीने (MPCC ) एप्रिल 2019 मध्ये या खात्यावर मातोंडकर यांच्या नावे 50 लाख रुपये निवडणूक निधी म्हणून जमा केले.

निवडणूक आयोगाच्या नियमानूसार लोकसभा निवडणुकीत उमेदवारास 70 लाख रुपये खर्च करता येतात. अलिकडेच निवडणूक आयोगाने ही रक्कम 10 टक्क्यांनी वाढवून 77 लाख इतकी केली आहे.