Uran Fire: ONGC प्लांटच्या आगीमुळे मुंबई व नवी मुंबई परिसरात गॅस तुटवड्याची शक्यता, महानगर गॅस कंपनीची माहिती
ONGC Plant Fire Affects Gas Supply In City (Photo Credits: File Image, Twitter)

उरण (Uran) जवळ ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लॅंटला (Oil and Natural Gas Corporation) आज (2 सप्टेंबर) रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आले असले तरी यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्लांट मधून शहराला गॅस सीएनजी (CNG)  व पीएनजी (PNG) गॅस पुरवठा होतो. मात्र आगीमुळे हा पुरवठा खंडित होऊन याचा जबर फटका मुंबई (Mumbai)  व नवी मुंबई (Navi Mumbai) शहरातील रिक्षा टॅक्सीच्या वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. याबाबत महानगर गॅस कंपनीने (Mahanagar Gas Company) ट्विट करून माहिती दिली आहे.

महानगर गॅस कंपनीच्या ट्विट मध्ये या दुर्घटनेमुळे वडाळा येथीसल एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनवरील पुरवठ्यावरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच स्थानिक पीएनजी ग्राहकांचा पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याचा एमजीएलचा प्रयत्न आहे मात्र दुर्घटनेनंतर गॅस पुरवठा पाइपलाइन मधून कमी दाबाने गॅस पुरवठा होत असल्याने अनेक सीएनजी स्टेशन्सवर गॅसची कमतरता जाणवू शकते असेही कंपनीतर्फे सूचित करण्यात आले आहे. हा पुरवठा पुर्वव्रत होईपर्यंत ग्राहकांनी पर्यायी इंधनाची तरतूद करावी असा सल्ला देत कंपनीने गैरसोयीची खेद व्यक्त केला आहे.

महानगर गॅस कंपनी ट्विट

दरम्यान, आज सकाळी लिक्विड गळतीमुळे ही आग लागली होती. या आगीची भीषणता पाहता लगतच्या एक ते दीड किमी परिसरातील गावकऱ्यांना गाव सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता आग आटोक्यात आले आहे अशी माहिती पोलीस उपयुक्त अशोक दुधे यांनी दिली आहे. यापूर्वी देखील ओएनजीसी प्लँटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शहरात गॅस पुरवठावर परिणाम झाला होता.