Unseasonal Rain Update: राज्यभर अवकाळी पाऊस; मुंबई, ठाणे, सातारा सांगलीसह बुलढाणा, परभणी जिल्ह्यातही 'सरीवर सरी'
Unseasonal Rain | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) राज्यात धुमाखूळ घातला आहे. ज्यामुळे उभ्या पिकांना तर फटका बसलाच आहे. पण, अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने काढणीला आलेली पिकेही जमीनदोस्त झाली आहेत. आभाळच फाटलं तर ठिगळ लावायचे तरी कुठे असा उद्विग्न प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. आतार्यंत ग्रामीण भागात पडत असलेला अवकाळी पाऊस आता मुंबई (Mumbai Rain Update), ठाणे, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्येही पडू लागला आहे. त्यामुळे सध्या राज्यभर अवकाळी पावसाची अवकृपा असे या पावसाचे वर्णन केले जाऊ लागले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यभरात 25 जिल्ह्यांतील एक लाख 39 हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.

मुंबईसह उपनगरे आणि लगतच्या ठाणे जिल्ह्यातही पाऊस

मुंबईत शहर आणि उपनगरांच्या विविध भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. त्यासोबत मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहर आणि जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मुंबईमध्ये जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली दहिसर आदी भागांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूला ठाण्यामध्ये दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरसह ठाण्याच्या ग्रामिण भागातही पावसाच्या सरी जोरदार बरसल्या. (हेही वाचा, Mumbai Rains: मुंबईत पाऊस, नेटीझन्स खूश; सोशल मीडियावर मिम्सचा वर्षाव, अनेकांनी शेअर केले रोमँटीक फोटो)

मुंबई, ठाणे, पुणे पलिकडील महाराष्ट्रातही जोरदार पाऊस

मुंबई, ठाणे , पुणे यांपलीकडे जाऊन महाराष्ट्राचा विचार करायचा तर उर्वरीत महाराष्ट्रालाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. खास करुन लढाणा (Buldhana), परभणीत (Parbhani), अकोला, बुलढाणा, सातारा, धुळे, वर्धा, अमरावती आदी जिल्ह्यांमध्ये अवकाळीने शेतीला चांगलीच अवकळा आणली आहे. या पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, ज्वारी या पिकांना फटका बसला आहे. तर सर्वाधिक नुकसान द्राक्ष उत्पादकांचे झाले आहे. नागपूरसारख्या जिल्ह्यांमध्ये संत्रा पिकालाही मोठा फटका बसला आहे.

ठाणे जिल्ह्यात आज पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटे सहाच्या सुमारास मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट यांसह पावसाच्या सरी जोरदार बरसल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे पहाटेच्या वेळी फिरायला (Morning Walk) गेलेल्या आणि दिवसपाळीच्या कामासाठी घरातून सकाळी लवकर बाहेर पडणाऱ्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.