Crops affected by Unseasonal Rain (PC - Twitter)

राज्याच्या (Maharashtra) विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) थैमान घातलं आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी (Farmers) हा हवालदिल झाला आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या ठिकाणी वादली पावसासह अनेक भागात गारपीट झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला असून शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने तातडीनं नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

नगरमधील अकोले तालुक्यातील आढळा विभागातील समशेरपूर, टाहाकारी, सावरगाव पाटसह परिसरात आज संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी काही परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीटसह अतिवृष्टी झाली. गारपीट आणि अतिवृष्टीमुळं या भागातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीने हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. नाशिकच्या सटाणा डांगसौंदाणे परिसरात पुन्हा गारपीट झाली आहे. सटाणा तालुक्यातील अंबासन, मोराणे, सारदे, बिजोरसे शिवारात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अनेक वीजेचे खांब आमि झाडे उन्मळून पडली आहेत.

राज्यातील अवकाळी पावसाचा  मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं पिकांचं नुकसान झालं आहे. केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे नुकसान झालं आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.