Pune Cosmos Bank Cyber Attack: 94 कोटी लंपास करण्यामागे 'उत्तर कोरिया' च्या हॅकर्सचा हात; संयुक्त राष्ट्राचा अहवाल
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बॅंकेमधून (Cosmos Bank) वर्षभरापूर्वी अवघ्या काही तासामध्ये तब्बल 94 कोटीवर डल्ला मारण्यात आला होता. या सायबर हल्ल्यानंतर देशभरात भीतीचं वातावरण होतं. मात्र आता संयुक्त राष्ट्राच्या (UN) एका अहवालात या सायबर हल्ल्यामध्ये (Cyber Attack)  उत्तर कोरियातील (North Korea) हॅकर्सचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

11 आणि 13 ऑगस्ट 2018 दिवशी पुण्याच्या कॉसमॉस बॅंकेमधून 2 तास 13 मिनिटामध्ये 94 कोटी 42 लाख लाख रूपये गायब झाले होते. कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्वीचवर डिजिटल दरोडा पडला होता. कॉसमॉस बॅंकेवरील दरोडा हा पूर्वनियोजित, अतिशय चलाखीने आणि योग्य समन्वय राखून करण्यात आला होता असे अहवालात म्हटले आहे.

कॉसमॉस बॅंकेमधून परदेशात विविध बॅंकांमध्ये ते वळवण्यात आले होते. त्यासाठी मालवेअरच्या सहाय्याने आभासी स्विचिंग सिस्टिम बनवण्यात आली होती. त्याद्वारा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. कॉसमॉस बॅंकेच्या सिस्टीम द्वारा ही माहिती दिल्यानंतर पैसे परदेशातील बॅंकांमध्ये वळवण्यात आले. या हल्ल्यामध्ये खातेदार्‍यांच्या नावाने बनावट कार्ड्स बनवली गेली. 21 विविध देशामध्ये ही बनावट कार्ड्स वापरून पैसे काढण्यात आले.