Ulhasnagar Dog Attack: उल्हासनगरमध्ये 14 वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी
Street Dogs | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

सध्या राज्यात आणि देशात भटक्या कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणावर वाढली असून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा जीवही गेला तर अनेक जण गंभीर जखमी देखील झाले आहेत. दरम्यान उल्हासनगरमधून अशीच एक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमधील बुद्ध कृपा बिल्डिंगजवळील आवारात राहणाऱ्या प्रदीप तिवारी यांचा 14 वर्षीय मुलगा अर्पित या हल्यात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या मुलावर सहा ते सात भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला जखमी केले. (हेही वाचा - Pune Dog Attack Video: पुण्याच्या हांडेवाडीत भटक्या कुत्र्यांचा चिमुरड्या वर हल्ला, व्हिडिओ व्हायरल)

उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक येथील बुद्ध कृपा बिल्डिंगजवळील आवारात राहणाऱ्या प्रदीप तिवारी यांचा 14 वर्षीय मुलगा अर्पित हा सकाळी दुधाची पिशवी घेऊन घरातून दूध घेण्यासाठी बाहेर पडला. त्यानंतर त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला, तो खाली पडला आणि कुत्रे त्याला चावू लागले आणि ओरबाडू लागले. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी त्याला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले आणि जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

सध्या या मुलावर उपचार हे सुरू आहेत. अर्पित तिवारीच्या आधी अनेकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांबाबत महापालिकेने योग्य ती पावले उचलावीत, असे आवाहन नागरिकांनी केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांची दहशत पहायला मिळत आहे. सरकारने या भटक्या कुत्र्यांच्या बाबात तातडीने काही कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.