MLA Ganpat Gaikwad | (Photo Credits: Facebook)

भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) गोळीबार प्रकरणात पोलीस दलाला मोठे यश प्राप्त झाले आहे. गुन्हे शाखेने गायकवाड यांचा खासगी चालक रणजीत यादव याला शनिवारी अटक केली आहे. रविवारी उल्हासनगर कोर्टात रणजीत याला हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (हेही वाचा - MLA Ganpat Gaikwad: उल्हासनगर गोळीबार प्रकरण, गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी)

उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्यासह 6 जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांचा मुलगा वैभव याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल असून वैभव व नागेश बडेकर याचा पोलीस शोध घेत आहेत.

रणजीत यादव हा आमदार गणपत गायकवाड यांचा खाजगी चालक आहॆ. क्राईम ब्रँच पोलिसांनी रणजीत यादवला शनिवारी ताब्यात घेत रविवारी उल्हासनगर कोर्टात हजर केले आहे. आत्तापर्यंत पाच जणांची चौकशी याप्रकरणी करण्यात आली आहे. महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांची देखील पोलीस चौकशी करणार आहेत, अशी देखील माहिती समोर आली आहे.