UGC Final Year Examination: विद्यापीठांच्या पदवी परीक्षा 2020 घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर महाराष्ट्र कॉंग्रेसची  पहिली प्रतिक्रिया; पहा काय म्हणाले युवा अध्यक्ष सत्यजित तांबे
Satyajeet Tambe | Photo Credits: Twitter

महाराष्ट्रामध्ये यंदा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षांशिवाय (UGC Final Year Examination) पास करून थेट पदवी देण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने ब्रेक लावला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय सुनावताना परीक्षा रद्द होऊ शकत नाही मात्र राज्य सरकार युजीसी (UGC) सोबत बोलून परीक्षांच्या तारखा पुढे ढकलू शकते. असा आदेश दिला आहे. यावर महाराष्ट्र कॉंग्रेस कडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. कॉंग्रेस युवा अध्यक्ष सत्यजित तांबे ( Maharashtra State Youth Congress President Satyajeet Tambe) यांनी आपली प्रतिक्रिया देताना किमान महाराष्ट्रात यंदाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा. त्याबाबत महाराष्ट्र सरकारने युजीसी सोबत बोलावं असं सत्यजित तांबे यांचं मत आहे. त्यांच्यामते, पूर्वी केवळ शहरी भागामध्ये पसरणारा कोरोना आता ग्रामीण महाराष्ट्रातही फोफावत आहे. त्यामुळे राज्यातील आणी देशातील वाढती कोरोना रूग्णसंख्या चिंतेचा विषय बनत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान महाराष्ट्र सरकारने कोर्टात राज्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेण्याबाबत असमर्थता दर्शवली होती. त्याबाबत अ‍ॅफिडेव्हिट देखील सादर केले होते. दरम्यान विद्यार्थ्यांना कोरोना संकटकाळात परीक्षांसाठी बोलावणं या मुद्द्यावरून युवा सेना कोर्टात पोहचली होती. आज कोर्टाने परीक्षा बंधनकारक असली तरीही ती कधी घ्यायची याचा निर्णय घेण्याची मुभा राज्य सरकारला दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आपल्या भूमिकेवरच ठाम राहणार की परीक्षा घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये शिवसेनेच्या युवा सेनेने दाखल केलेल्या याचिकेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा देत कोरोना काळात परीक्षा रद्द करण्याचा निर्णयाला आधीच पाठिंबा दिला होता.

सत्यजित तांबे ट्वीट

दरम्यान युजीसीकडून 6 जुलै दिवशी जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्सनुसार विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सप्टेंबर 2020 च्या अखेरीपर्यंत घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन किंवा दोन्हींचा मिलाफ करून घ्यावा अशा युजीसीच्या सूचना होत्या.

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती पाहता, काल रात्री आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 14,718 नव्या रूग्णांची भर पडली असून 355 जणांचा बळी गेला आहे. तर महाराष्ट्र राज्यातील कोविड19 रूग्णांचा एकूण आकडा 7,33,568 वर पोहचला आहे.