उद्धव ठाकरे घेणार गोपीनाथ गडावर महायुतीचे शिल्पकार गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन?
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (फोटो सौजन्य- ट्वीटर)

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून आठवडा उलटला असला तरीही अजून सत्ता स्थापनेसाठी संघर्ष कायम आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी 145 हा बहुमताचा आकडा गाठण्यासठी वाटाघाटी सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख सध्या शेतकर्‍यांच्या भेटीसाठी बीड दौर्‍यावर आहेत. परतीच्या पावसामुळे सध्या महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे. या ओल्या दुष्काळीच्या पाहणीसाठी बीड मध्ये पोहचलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज ( 5 नोव्हेंबर) गोपीनाथ गडावर जाणार का? याबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान आज नांदेडमध्ये कंधार, लातूर मध्ये अहमदपूर आणि परभणी मध्ये गंगाखेड तालुक्यांना उद्धव ठाकरे भेट देण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात शिवसेना - भाजपा युती एकत्र लढले. मात्र आता सत्तेतील समसमान वाटपासाठी वाटाघाटी होत असल्याने युतीमध्ये तणावाचे संबंध आहेत. या महायुतीचे शिल्पकार असणार्‍या गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळावर म्हणजेच गोपिनाथ गडावर उद्धव ठाकरे जाणार का? अशा चर्चा आता रंगायला सुरूवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज युतीतील दोन्ही पक्षांच्या निशाणीची खास रांगोळी देखील साकारण्यात आली आहे. त्याखाली 'आठवण साहेबांची' असं लिहण्यात आलं आहे. दरम्यान परळी वैजनाथमार्गे ते माजलगावला जाताना उद्धव ठाकरे गोपिनाथ गडावर जाण्याची शक्यता आहे.

24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर अद्याप सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. 9 नोव्हेंबरला 13 व्या विधानसभेचा राज्यातील कार्यकाळ संपत आहे. त्याआधी सत्ता स्थापन करणं आवश्यक आहे. मात्र शिवसेना - भाजपामध्ये अजूनही सत्ता वाटपावरून संघर्ष सुरू असल्याने काही नवी समीकरणं देखील उद्याला येऊ शकतात अशी चित्रं आहेत.