उद्धव ठाकरे यांनी 'सामना' वृत्तपत्राचे नाव बदलून 'सोनिया नामा' करावे- जीव्हीएल नरसिम्हा राव
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राच्या (Maharashtra) मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विराजमान झाल्यानंतर सर्वच राजकीय नेत्यांकडून त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच सोनिया गांधी , राहुल गांधी, नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांचाही यात समावेश आहे. परंतु, भाजपचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ता जीव्हीएल नरसिम्हा यांनी दिलेल्या शुभेच्छांची अधिक चर्चा होऊ लागली आहे. नरसिम्हा यांनी शुभेच्छातून उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. उद्धव ठाकरे हे गोडसे भक्त असून त्यांनी सामना वृत्तपत्राचे नाव बदलू सोनिया नामा करावे, असे ट्विटरच्या माध्यमातून नरसिम्हा यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवतिर्थावर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शिवसेना समर्थाकांसह भाजप पक्षातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी देखील उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. मात्र त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना गोडसे भक्त म्हणत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या गोडसेभक्त उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा. तुम्ही आणि तुमच्या आमदारांनी एका राजवटीसमोर निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली आहे. सामनाचे नाव ‘सोनिया नामा’ करत आता पूर्ण आत्मसमर्पण करा. तुमच्या तिसऱ्या दर्जाच्या वृत्तपत्रात येणाऱ्या मूर्ख संपादकीय ते सहन करणार नाहीत" असे ट्विट करत नरसिम्हा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

जीव्हीएल नरसिम्हा राव यांचे ट्वीट-

उद्धव ठाकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज दुपारी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद दिल्याने शिवसेना समर्थकांसह शेतकरी वर्गातही आनंदमय वातावरण निर्माण झाले आहेत. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संपर्क साधत असतात. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ते योग्य निर्णय घेतली, अशी अपेक्षा केली जात आहे.