गेल्या काही दिवसांपासून राज्यात नदी किंवा धरणाच्या पाण्यात बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली पहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात देखील अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र निर्माण झालेले पहायला मिळत आहे. नाशिकरोड परिसरात देखील आंघोळीसाठी गेलेल्या चार मित्रांपैकी दोघांचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकाच परिसरातील दोन मुले बुडाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वाढत्या उन्हांपासून हैराण झालेल्या या चार मित्रांनी नदीवर अंधोळीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. नाशिकरोड येथील मित्रांचा ग्रुप सिन्नर फाटा परिसरात आंघोळीसाठी गेला असता चेहेडी बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास सिद्धार्थ संकेत गांगुर्डे, राहुल दीपक महानुभाव, संतोष नामदेव मुकणे आणि आर्यन नंदू जगताप हे चार युवक आंघोळीसाठी गेले होते. त्यातील दोघांनी बंधाऱ्यावरुन पाण्याच्या प्रवाहात पूर्वेच्या दिशेला पाण्यात उडी मारली. याचवेळी सिद्धार्थ गांगुर्डे आणि राहुल महानुभाव हे दोघे पाण्याच्या उलट्या प्रवाहात सापडल्याने त्यांना पाण्यातून बाहेर येणे कठीण झाले त्यांनी मदतीसाठी धावा देखील केला पंरतू त्याचाही काही फायदा झाला नाही.
दोन्ही काठावरील मित्रांनी हा प्रकार गावकऱ्यांना सांगितला. तातडीने नजीकच्या अग्निशमन दलाला याबाबत कळवण्यात आल्यानंतर पथक पोहोचले. त्यानंतर रात्री उशिरापर्यत शोधमोहीम सुरु होती. मात्र दोघांचेही मृतदेह अद्याप आढळून आलेले नाहीत. मात्र या दोघांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एकीकडे पोहण्याचा मोह तरुणांचा जीवावर बेतला आहे.