Tushar Gandhi | PC: Twitter/ANI

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या महाराष्ट्रामधील बिरसा मुंडा जयंतीच्या कार्यक्रमातील 'स्वातंत्र्यवीर माफीवीर' हे वक्तव्य चर्चेमध्ये आले आहे. यावरून महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. शिवसेना, मनसे, भाजपा कडून राहुल गांधींच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. पण आज महात्मा गांधीजी यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) राहुल गांधींच्या मदतीला धावून आले आहे. त्यांनी राहुल गांधीजींची पाठराखण करत 'वीर सावरकरांची इंग्रजांशी मैत्री होती हे खरे आहे. त्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली होती. आम्ही ही माहिती व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीतून घेतलेली नाही तर इतिहासात पुरावे आहेत.' असं ते म्हणाले आहे.

ANI सोबत बोलताना तुषार गांधी यांनी देखील राहुल गांधींजींच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. ते राहुल गांधींजींच्या भारत जोडो यात्रेमध्येही सहभागी झाले आहेत. 'यात्रा या परंपरेचा भाग आहेत, त्यांनी अनेक वर्षांमध्ये अनेक क्रांतींना जन्म दिला आहे. आज जेव्हा देश आपल्या पूर्वजांनी उभारलेल्या बांधणीच्या विरोधात वाटचाल करत आहे, तेव्हा आपण हार मानली नाही याची जाणीव लोकांना होणे गरजेचे आहे.' असेही ते म्हणाले आहेत.

पहा ट्वीट्स

दरम्यान राहुल गांधी यांच्यावर चौफेर टीका होत असताना काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा माफीनामा सादर करत वाचूनही दाखवला आहे. यावेळी त्यांनी सावरकरांच्या या माफीमुळे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या नेत्यांसोबत गद्दारी केल्याचं देखील म्हटलं आहे.

तुषार गांधींनी पाठराखण केली असली तरीही राहुल गांधींना महाराष्ट्रात येऊन सावरकरांच्या भूमीतच असं वक्तव्य करण्याची गरज नसल्याचं शिवसेनेचे मुख्य प्रतोद संजय राऊत म्हणाले आहेत. ही बाब महाविकास आघाडीच्या मूळावर उठू शकते असेही त्यांनी संकेत दिले आहेत. तर मनसे आज राहुल गांधींची सभा उधळून लावण्यासाठी शेगाव मध्ये जात असताना त्यांच्या मुख्य नेत्यांनाच पोलिसांनी रस्त्यात अडवून ताब्यात घेतले आहे. बाळासाहेबांची शिवसेना मध्ये सहभागी खासदार राहुल शेवाळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या वक्तव्यानंतर राहूल गांधींची यात्रा महाराष्ट्रातच गुंडाळा अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.