
गेल्या पंधरा दिवसांपासून मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांच्या बदलीची फाइल पडून होती, त्यावर आता स्वाक्षरी झाल्याने ‘नाशिक मनपा’चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंढे यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती केली गेली असून, त्यांच्या जागी मुंढे यांची पाठवणी करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांनी 8 फेब्रुवारी 2018 रोजी नाशिकच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती. सत्ताधारी भाजप तसेच विरोधी पक्षातील इतर नेत्यांसोबत मुंढे यांचे वारंवार खटके उडत होते यामुळे तुकाराम मुंढे यांची बदली केल्याचे सांगितले जात आहे.
अतिशय कर्तव्यनिष्ठ, तत्वनिष्ट असलेले तुकाराम मुंढे यांची नाशिकमध्ये 11 वी नियुक्ती होती. मुंढे जिथे जातील तिथे त्यांच्या कामाची शिस्त आणि कामाचा आवाका दिसून येतो. नियमांची होणारी पायमल्ली थांबवून लोककल्याणासाठी जे योग्य आहे, अशा गोष्टी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता करणे हे मुंढे यांचे वैशिष्ट होय. यामुळेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचे कधीच पटले नाही. म्हणूनच वर्ष-दीड वर्षांपेक्षा जास्त काळ ते कुठेच टिकले नाहीत. मात्र या प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. ते जिथे जातील तिथे कर्मचाऱ्यांना शिस्त लावतात. गैरव्यवहार मोडून काढतात अशी त्यांची ओळख आहे.
अंदाजपत्रकात नगरसेवकनिधीची तरतूद न करणे, 257 कोटींच्या रस्त्यांच्या कामांच्या निविदा रद्द करणे, लोकप्रतिनिधींच्या कामकाजात हस्तक्षेप करणे, नागरिकांसमोरच लोकप्रतिनिधींचा अवमान करणे अशा अनेक कारणांमुळे मुंढे वादग्रस्त ठरले. नाशिक महापालिकेत मुंढे यांच्याविरूध्द अविश्वास ठराव दाखल करण्याची ऐतिहासीक घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे ही नामुष्की टळली असली तरी त्यांच्यावर बदलीची टांगती तलवार होती. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून बदलीची चर्चा सुरू होती. अखेरीस ती खरी ठरली.
तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. प्रोबेशननंतर 2006 मध्ये त्यांनी सोलापूरचे आयुक्त म्हणून कामाला सुरूवात केली. गेल्या 12 वर्षात त्यांच्या तब्बल 11 वेळा बदल्या झाल्या आहेत. नाशिकच्या आधी तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईचे आयुक्त, पुण्यात PMPL चे आयुक्त आणि पिंपरी-चिंचवडचे आयुक्त म्हणून काम पहिले आहे.