मुंबई वाहतूक कोंडी (संग्रहित संपादित प्रतिमा)

मार्च पासून देश कोरोना व्हायरस (coronavirus) संकटाशी लढत आहे. यावरील उपययोजना म्हणून देशात लॉक डाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आले. सलग चार टप्प्यात हे लॉक डाऊन सुरु होते व आता लॉक डाऊनच्या पाचव्या टप्प्यात (Lockdown 5) काही नियम शिथिल केले आहेत. याद्वारे सध्या कार्यालये व काही दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. आजपासून लॉक डाऊनचा 5 वा टप्पा सुरु झाल्याने हे नवीन नियमही आजपासून लागू करण्यात आले. मात्र आज पहिल्याच दिवशी राज्याची राजधानी मुंबईमध्ये (Mumbai) प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) पाहायला मिळाली. आज संध्याकाळी अंधेरी परिसरातील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तर नेहमीपेक्षा जास्त ट्राफिक होते.

कोरोना व्हायरसच्या कालच्या मुंबईतमधील आकडेवारीनुसार, शहरात 1,244 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर, 52 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 39,464 वर पोहचली आहे. यापैंकी 1,279 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिस्थती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. लोकांना सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले आहे, मात्र आज काही प्रमाणात नियम शिथिल झाल्याने, परिस्थितीची गांभीर्य न ठेवता लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवारही हीच परिस्थिती होती. (हेही वाचा: महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; 3 व 4 जून रोजी मुंबई, ठाणेसह 'या' जिल्ह्यांना Red Alert जारी)

आज सकाळीही शहरात हीच परिस्थिती होती. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या काही भागात हळू चालणार्‍या रहदारीची नोंद झाली. सोमवारी सकाळी उपनगरामधील सायन-पनवेल रोड व इतर भागात भाजी मार्केट बाहेर वाहतूक प्रचंड मंदावली होती. 5 जूनपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजारपेठ आणि दुकाने यापैकी सम-विषम आधारावर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दुकानदार, व्यावसायिक माल आणण्यासाठी बाहेर पडल्यामुळे ट्राफिक वाढले असावे अशी शक्यता व्यक्त केली जाता आहे.