Ram Kadam & Pankaja Munde (Photo Credits: Twitter/Facebook/ Pixabay)

संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) महाराष्ट्रालाही विळखा घातला आहे. दिवसागणित कोरोना बाधित रुग्णांची वाढत जाणारी संख्या भीतीजनक वातावरण निर्माण करत आहे. राज्यात 39 कोरोनाग्रस्त रुग्ण असून आज (मंगळवार, 17 मार्च) मुंबईत एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेला रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह होता. मात्र त्याला इतर अनेक आजार असल्याने नेमका मृत्यू कशामुळे झाला हे रिपोर्ट्स आल्यानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तरी देखील कोरोना व्हायरसच्या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde), राम कदम (Ram Kadam) या राजकीय नेत्यांनी Lockdown चा खास सल्ला दिला आहे.

भाजप नेते राम कदम यांनी मुंबईत झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसंच कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरात सरकारने Lockdown घोषित करावा, असेही ते म्हणाले. (तुमचे घर सुरक्षित ठेवा! कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून नागरिकांना आवाहन)

ANI Tweet:

त्याचबरोबर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी Lockdown चा उपाय सुचवला आहे. "मुंबईत Lockdown उपयोगी पडेल? नीट योजना केल्यास घरी वस्तूंची तरतूद करुन ठेवता येईल. लोकल ट्रेन्स 7 दिवसांसाठी बंद केल्यास अनेक लोकांना व्हायरसचा संसर्ग होण्यापासून बचाव होईल. दुकानं चालू राहतील. मात्र व्हिंडो शॉपिंग करता येणार नाही. फक्त गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात जाता येईल. असं काहीतरी केलं तर मदत होऊ शकते," अशा आशयाचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

पंकजा मुंडे ट्विट:

राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शाळा, महाविद्यालयं, जीम, थिएटर्स, स्विमिंग पूल्स, जीम बंद ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम देण्यासाठी अनेक कॉर्पोरेट कंपन्या तयार झाल्या आहेत. तसंच अनेक नेते, सेलिब्रेटी यांच्याकडून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.