Torres Jewellery Scam (फोटो सौजन्य - X/@pulse_pune)

Torres Jewellery Scam: मुंबईतील दादर परिसरात पॉन्झी स्कीम चालवणाऱ्या चिटफंड कंपनीचा पर्दाफाश झाला आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी या खासगी कंपनीच्या दोन संचालक आणि तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गुंतवणुकीच्या कथित फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. टोरेस स्टोअर (Torres Store) चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड (Platinum Hern Private Limited) या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 वर्षीय भाजी विक्रेते प्रदीप कुमार वैश्य यांच्या तक्रारीवरून संचालक सर्वेश सुर्वे आणि व्हिक्टोरिया कोवलेन्को, सीईओ तौफिक रिया उर्फ ​​जॉन कार्टर, महाव्यवस्थापक तान्या कस्तोवा आणि स्टोअर इन्चार्ज व्हॅलेंटिना कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी टोरेस ज्वेलरी कंपनीत गुंतवणूक केली होती. दरम्यान, मंगळवारी गुंतवणुकदारांनी टोरेस ज्वेलरी कार्यालयाच्या समोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

पॉन्झी योजनेत एकूण 13.48 कोटी रुपये गमावले -

दरम्यान, आतापर्यंत सात गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी आतापर्यंत पॉन्झी योजनेत एकूण 13.48 कोटी रुपये गमावलेल्या किमान सात लोकांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यात त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर मासिक व्याज देण्याचे वचन दिले होते. आरोपीने मुंबई, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर परिसरातील अनेक गुंतवणूकदारांना फसवल्याचा पोलिसांना संशय आहे. (हेही वाचा -Cyber Fraud Mumbai: मुंबई येथील 78 वर्षीय महिलेची सायबर फसवणूक; Digital Arrest द्वारे 1.5 कोटी रुपयांना गंडा)

काय आहे नेमकं प्रकरण?

टोरेस ज्वेलरी कंपनीवर हजारो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये घेऊन फरार झाल्याचा आरोप आहे. कंपनीचे मीरा-भाईंदरचे आऊटलेट सोमवारी अचानक बंद झाल्याने दुकानाबाहेर गुंतवणूकदारांची गर्दी झाली. यासंदर्भात कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीशी संपर्क होऊ शकला नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर कंपनीशी संबंधित एका महिलेने सांगितले की, वेबसाईटमधील तांत्रिक अडचणींमुळे गुंतवणूकदारांचे परतावे त्यांना पाठवले जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा, Goregaon Digital Arrest Scam: 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात ज्येष्ठ नागरिकांची 1.33 कोटींची फसवणूक; मुंबई येथील गोरेगाव परिसरातील घटना)

प्राप्त माहितीनुसार, 2023 मध्ये नोंदणीकृत 'प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीने 2024 मध्ये 'टोरेस' ब्रँड अंतर्गत दादरमध्ये 30 हजार स्क्वेअर फुटांचे आउटलेट उघडले. यानंतर कंपनीने मीरा-भाईंदरसह इतर ठिकाणी आऊटलेट्स उघडले. कंपनीने सोने, चांदी आणि हिरे खरेदीवर त्याच रकमेवर अनुक्रमे 48, 96 आणि 520% ​​वार्षिक परतावा देण्याचे वचन दिले. रिटर्न साप्ताहिक भरले जात होते. दोन आठवडे परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.