Pune : सोशल मिडीयाचा (Social Media) वापर जितका वाढला आहे, तितकाच तो घातक होऊ लागला असल्याची उदाहरणे आपण नेहमीच ऐकतो. सोशल मिडीयाचा वापर करून महिलांना धमकावणे, बदनाम करणे असे प्रकार तर सर्रास घडतात. आता याही पुढे जाऊन सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना फसवणे आणि लुबाडण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. या भामट्याने फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेशी मैत्री करून तिच्या घरातील 8 लाखांवर डल्ला मारला आहे. पुण्यातील खराडी भागात ही घटना घडली आहे, याबाबत राहुल हमीर मर्चंट (वय 43, रा. टस्कन इस्टेट, खराडी) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मर्चंट हे आपल्या आई (वय 69)सोबत खराडी भागातील एक उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतात. जुलै 2018 मध्ये अनिल ननवाणी नावाच्या व्यक्तीने त्यांच्या आईला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्रीपूर्ण बोलणे सुरु झाले, ते व्हॉट्सअॅप तसेच अधून-मधून फोनवर बोलू लागले. दरम्यान या भामट्याने आई-वडिलांनी मला घराबाहेर काढले आहे, आता कोणाचा आधार नाही, असे सांगत भावनिकता निर्माण केली. तसेच, या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तो दोन-तीन वेळा त्यांच्या घरीदेखील येऊन गेला. दरम्यान त्याने घरातील सर्व माहिती घेतली, तसेच त्याला या महिलेचा मुलगा कामानिमित्त बाहेर जातो हेदेखील माहित झाले. (हेही वाचा : तब्बल साडेपाच हजार पुणेकरांची ऑनलाईन फसवणूक; कोट्यावधी रुपयांची चोरी)
शनिवारी फिर्यादी गावी गेल्यानंतर दुपारी हा भामटा घरी आला. ज्येष्ठ महिलेने त्याच्यासाठी स्वयंपाक केला. दोघांनी मिळून जेवणही केले. त्यानंतर त्याने तिजोरीत ठेवलेली दोन घड्याळे, रोकड आणि दागिने असा एकूण 8 लाख 8 हजारांचा ऐवज लंपास केला. मर्चंट घरी परत आल्यावर हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. आता पोलिसांकडे याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलीस या भामट्याचा शोध घेत आहेत.