...तर, महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचा पराभव; मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्तवले भविष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित प्रतिमा)

युतीसाठी दबाव टाकण्याचे अनेक प्रयत्न करुनही शिवसेना स्वबळावर ठाम आहे. त्यामुळे २०१९ची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन रणनिती आखणाऱ्या भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर, शिवसेना-भाजप युती नाही झाल्यास काय होईल याचे भविष्यच वर्तवून टाकले आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप युती झाली नाही. तर, मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा थेट काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल आणि शिवसेना-भाजपचा पराभव होईल, असे स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष आहे, असे सांगतानाच आम्हीही स्वबळावर लढण्यासाठी तयार आहोत. कदाचित आमचा एक-दोन जागांवर पराभव होईल. पण, राष्ट्रीय स्तरावर असलेली युती अभेद्य असायला हवी, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी 'हिंदूस्तान टाईम्स' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना-भाजप आणि निवडणुका यासंदर्भात भाष्य कले. शिवसेनेने स्वबळाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्या पक्षाला युतीसाठी कसं तयार करणार? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, युती होण्यासाठी राजकीय स्थिती कारणीभूत ठरते. ही स्थितीच युतीसाठी लोकांना तयार करते. आपले मत अधीक स्पष्ट करुन सांगताना फडणवीस म्हणाले, उत्तर प्रदेशमध्येही समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या दोन पक्षांनी युती केली. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असे कोणालाही वाटले नव्हते. आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय काँग्रेससोबत फारकत घेत वेगळी वाट निवडली. पण, निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले असा महाराष्ट्रातील दाखलाही फडणवीस यांनी मुलाखती दरम्यान दिला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष आहे. अर्थात, आमचे काही मुद्द्यांवर मतभेद आहेत. पण, आमची विचारधारा एकसारखी आहे. राष्ट्रवादीबाबत बोलायचे तर, आमच्या पक्षाचे आणि त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येणे अशक्या आहे.