दीक्षांत समारंभाच्या पोषाखाबाबत Mumbai University कडून खुलासा; बदलामागील सत्य आलं समोर
Mumbai University Convocation Attire Issue | (File)

मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) विद्यार्थ्यांच्या दीक्षांत समारंभातील पोशाखात आता बदल केला आहे, अशी बातमी काल आली आणि चर्चासत्रांना उधाण आलं. पण मुंबई विद्यापीठाने केलेला पोशाखातील हा बदल फक्त प्रमुख पाहुणे, विद्यापीठाचे कुलगुरू, प्र- कुलगुरू, कुलसचिव, संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ, अधिष्ठाता, वित्त व लेखा अधिकारी विविध प्राधिकरणाचे मान्यवर सदस्य यांच्या पुरताच मर्यादित आहे. विद्यार्थ्यांच्या वेशात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे सूत्रांकडून कळले आहे.

काल सोशल मीडियावर 'विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभाचा बदललेला पोशाख' या कॅप्शनखाली हा फोटो व्हायरल झाला आणि अनेक मतमतांतरे समोर आली. काहींनी या बदलावर नाराजी व्यक्त करत आपण दिवसेंदिवस मागे चाललो आहोत, असे मत व्यक्त केले, तर काहींनी या बदलाचे स्वागत करत आपल्या संस्कृती जपण्याचा हा पर्यटन चांगला असल्याचे म्हटले. पण आता ह्या फोटोमागचा आणि पोशाख मागचा खरा उद्देश समोर आला आहे.

शिवकालीन-पेशवेकालीन अंगरखा आणि मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ यांची प्रसिद्ध पगडी असा आता दीक्षांत समारंभात मान्यवरांसाठी बदलण्यात आलेल्या या पोशाखाचं स्वरूप असणार आहे. भारताची प्रगाढ परंपरा आणि श्रीमंत संस्कृती या दोन्हीची सांगड या पोशाखात घालण्याचा विद्यापीठाचा उद्देश होता, असे सूत्रांकडून कळले आहे.

शिवकालीन असा हा अंगरखा शौर्यपूर्ण इतिहासाचं प्रतीक आहे. तर दुसरीकडे नाना शंकर शेठ यांसारखी पगडी ही अत्युच्च विद्वत्तेचं दर्शन घडवते. या पोशाखाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पोशाख पूर्णपणे खादीच्या कापडातुन बनवण्यात येईल. तसेच यामध्ये विविध प्रकारच्या रंगांची गुंफण असणार आहे. भारतीय संस्कृतीमधील समावेशकता या पोशाखातून प्रतीत होईल असेही पुढे सांगण्यात आले.