सोमवारपासून म्हणजचे 1 मार्चपासून सुरु झालेले महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session 2021) 10 मार्च रोजी संपणार आहे. मात्र या अधिवेशनातील महत्त्वाचा दिवस हा उद्या (8 मार्च) असणार आहे. कारण उद्या विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हा अर्थसंकल्प सादर करतील. यात महाराष्ट्राच्या जनतेला काय सवलती मिळणार, यामुळे फायदा होणार की नुकसान या सर्व गोष्टींवरून उद्या पडदा उठणार आहे. तसेच महागाईबाबत राज्य सरकार नागरिकांसाठी काय करणार याकडे देखील सा-यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान उद्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आधीच जनता महागाईने होरपळून गेली आहे. त्यात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात कपात केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Budget Session 2021: अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्णकाळ चालवण्यासाठी आरोग्य विभागाने सुचवला 'हा' पर्याय
तसेच महागाई संदर्भात राज्य सरकार महाराष्ट्रवासियांच्या पदरी काय पाडते हे उद्याच कळेल. तसेच शेतक-यांसाठी म्हणजेच बळीराजासाठी अर्थसंकल्पात काय विशेष तरतूद करण्यात येते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. महिला दिनी हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने महिलांसाठी काही विशेष घोषणा असणार का याकडे देखील लक्ष असणार आहे. शक्ती कायद्याबाबत सरकार काय घोषणा करते हे याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती, गुन्हेगारी, सरकारी यंत्रणा, बेरोजगारी याबाबत राज्य सरकार काही विशेष घोषणा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.