
कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली असताना मुंबईकरांना (Mumbai) दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. मुंबईत इतर जिल्ह्यांप्रमाणे कोरोनाची स्थिती नाही, मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे 100 टक्के लॉकडाऊनची (Lockdown) करण्याची गरज नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुणे शहरात आढळून आले आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाली होते. मात्र, इक्बाल सिंह यांच्या माहितीनंतर नागरिकांनी तात्पुरता का होईना, सुटकेचा श्वास घेतला आहे
मुंबईतील करोनाची स्थिती पुणे आणि ठाण्यासारखी नाही. येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांच्या वर गेला आहे. तर, रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याचा कालावधी 50 दिवसांपेक्षाही जास्त आहे. पुढील काही दिवसांत यात आणखी सुधारणा होईल, असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 92 हजार 988 वर पोहचली आहे. यापैकी 5 हजार 288 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 64 हजार 872 जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे देखील वाचा- मुंबईकरांनो पाण्याची चिंता नको! पाणीपुरवठा करणार्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात ऑक्टोबर पर्यंत पुरेल इतका साठा जमा
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक व्यवसाय, उद्योग धंदे, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या होत्या. मात्र, राज्य सरकारे मिशन बिगीन अगेनच्या अंतर्गत लॉकडाऊनच्या अनेक निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. लोकल, मेट्रो आणि एसटी सेवा वगळता इतर बहुतांश वाहतूक सेवांना काही प्रमाणात परवानगी देण्यात आली आहे. सरकारी व खासगी कार्यालये, हॉटेल, सलून यांनाही काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनलॉकला सुरुवात झाल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याबरोबर रुग्णांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे.