Chhatrapati Shivaji Maharaj International Airport. (Photo Credits: ANI)

भारत सरकारने काश्मीरला वेगळा दर्जा देणारे कलम 370 आणि 35 A हटवले. मोदी सरकारच्या या निर्णयाबाबत देशातून सुखकारक प्रतिक्रिया आल्या, मात्र पाकिस्तानचा (Pakistan) जळफळाट झाला. जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohamad) ही दहशतवादी संघटना जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्करावर हल्ले घडवून आणू शकते. त्यासोबत त्यांचे लक्ष्य मुंबई देखील असणार आहे. गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिलेल्या माहितीनुसार मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

कलम 370 रद्द झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्यासारखा हल्ला पुन्हा होऊ शकतो असे सांगितले होते. त्यानुसार आता जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा डोळा मुंबईवर असल्याची माहिती मिळत आहे. जैशच्या तीन जणांच्या टीमवर मुंबई हल्ल्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते अशी गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. या दृष्टीने सर्वत्र योग्य ती सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (हेही वाचा: कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने घेतला भारतासोबत व्यापार संबंध तोडण्याचा निर्णय)

सुरक्षेच्या दृष्टीने देशातील विमानतळांवरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी (BCAS)ने मुंबईसह देशभरातील विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे. विमानतळांसोबत एअरस्ट्रिप, फ्लाईंग स्कूल, हवाई वाहतूक प्रशिक्षण केंद्रांवरील सुरक्षादेखील वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 10 ते 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये आगंतुकांना विमानतळावर प्रवेश देऊ नका, विमानतळावरील नागरिकांची कडत तपासणी करा, सशस्त्र जवानांनी डोळ्यात तेल घालून सर्वत्र लक्ष ठेवावे, बॉम्ब शोधक पथक तैनात ठेवावे अशा या सूचना आहेत.