काँग्रेसचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी आपल्याला व आपल्या मुलीला भाजपने अनेकवेळा ऑफर दिली होती मात्र ती आपण मान्य केली नाही असा गौप्यस्फोट केला आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याची ऑफर होती. भाजपचा संबंधित नेता माझ्या तोडीचा होता, असे सांगतानाच सुशीलकुमार शिंदेंनी त्यांचे नाव घेणे मात्र टाळले. आपण कॉंग्रेसशी एकनिष्ठ आहोत त्यामुळे भाजपचा विचारही करणार नाही असे त्यांनी सांगितले. सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या सोलापुरातून काँग्रेस आमदार आहेत. प्रणिती यांनाही वारंवार भाजपप्रवेशाच्या ऑफर येत असल्याचा दावा सुशीलकुमार शिंदेंनी केला.
सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांची लढत बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांच्याशी आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना भाजपने मला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. जोपर्यंत जगू तोपर्यंत आम्ही काँग्रेसमध्येच राहणार आहोत. असेही ते यावेळी म्हणाले. (हेही वाचा: सपना चौधरी काँग्रेस ऐवजी भाजप मध्ये प्रवेश करणार?)
यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातूकडून संविधानाला गाडण्याचे काम होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर सुजय विखे-पाटील यांनी पक्षांतर करणे गैर नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसचे प्रामाणिक नेते आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.