Representational Image (Photo Credits: File Photo)

मुंबईमध्ये दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. मात्र अशा वेळेतही पोटाच्या भुकेपेक्षा व्यसनांची भुक जास्त लागत आहे. अशीच एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. नशा करण्यासाठी पैसे हवे असल्याने दोन तरूणांनी चोरीचा मार्ग निवडला. मात्र यामुळेच त्यांना जेलची हवा खावी लागली आहे. धूम स्टाईलने महिलेच्या हातातील पर्स चोरणं यांना चांगलच महागात पडले आहे. महिलेच्या तक्रारीवरून या दोघांना पकडण्यात बीकेसी पोलिसांना यश आलं आहे.

नेमके प्रकरण काय आहे ?

वांद्रे पश्चिम परिसरात राहत असलेल्या या तक्रारदार महिला त्यांच्या कामासाठी बीकेसीमध्ये आल्या होत्या. बीकेसीमधील नाबार्ड सिग्नलजवळ उभ्या असताना मोहम्मद अफाक शेख आणि अमोल सकपाळ हे दोघं दुचाकीवरून त्यांच्या हातातील पर्स हिसकावून घेऊन गेले. या घटनेच्या तक्रारीसाठी महिलेने पोलीसांकडे धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली.

तपासात पोलिसांनी पश्चिम आणि प्रादेशिक विभागातील 150 सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये वाशी टोलनाक्यावरील फुटेजमध्ये हे दोघं पोलिसांच्या नजरेस पडले. चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यात हेल्मेट घालून मुंबईत येताना दिसले . त्यांच्या दुचाकीची नंबर प्लेट ही कागद लावून झाकली होती. मात्र दुचाकीच्या मागे असलेल्या स्टिकरमुळे त्यांना पकडणे आणखी सोपे झाले. चोरी केल्यावर हे दोघं पुन्हा नवी मुंबईच्या दिशेने गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी बेलापूर, वाशी, घणसोली आणि कोपरखैरणे परिसरात तपास सुरु केला.

चोरीसाठी वापरलेली दुचाकी पोलिसांना कोपरखैरणे परिसरात असल्याची माहिती त्यांच्या खबऱ्यांकडून मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांना एका आरोपीला पकडण्यात यश आलें. यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर मोहम्मदने गुन्हा कबूल करत अमोल राहत असलेल्या ठिकाणाची माहिती पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमोलला ताब्यात घेतले.

चौकशीनंतर दोघांनीही गुन्हे कबूल करत नशा करण्यासाठी ते चोरी करत असल्याचे पोलिसांना सांगितले. अमोल आणि मोहम्मद हे दोघेही नवी मुंबईमध्ये राहतात. मात्र ते चोरी करण्यासाठी मुंबईत येत असल्याचे सांगितले. चोरी केलेल्या पर्समधून त्या महिलेचा मोबाईल त्यांनी लगेच विकल्याचे सांगितले. या घटनेचा संपूर्ण तपास वरिष्ठ निरीक्षक सचिन राणे तसेच सहाय्यक निरीक्षक सदाशिव सावंत, उपनिरीक्षक मच्छिंद्र सानप तसेच इतर कर्मचाऱ्यांनी केला. घटनेतील आरोपींना अटक केलेली असून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.