वेळापत्रकानुसार अचुक धावणारा रेल्वे मार्ग अशी ओळख असलेल्या ट्रान्स हार्बर (Trans-Harbour line) रेल्वे मार्गावरील वाहतूक तांत्रिक कारणांमुळे विस्कळीत झाली आहे. पनवेल (Panve) रेल्वे स्टेशनवर काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दरम्यान, अनेक रेल्वे रद्द झाल्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक नऊ आणि दहावर प्रवाशांची गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, प्रवाशांच्या माहितीसाठी असे की, ट्रान्स हार्बर रेल्वे मार्ग वाहतूक विस्कळीत झाली असली तरी, ज्या प्राशांना ठाणे ते वाशी दरम्यान प्रवास करायचा नाही अशा प्रवाशांना मध्य रेल्वेचा पर्याय उपलब्ध आहे. हे प्रवासी ठाणे रेल्वेस्टेशनवरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनजकडे जाणारी कोणतीही लोकल पकडून कुर्ला रेल्वे स्टेशनला उतरु शकतात. कुर्ला रेल्वे स्टेशनवरु हे प्रवासी हार्बर रेल्वे मार्गाचा वापर करुन वाशीच्या पुढील प्रवास करु शकतात.
दरम्यान, मुंबई आणि उपनगरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गांवरील वाहतूक विस्कळीत होणे हे आता नित्याचेच झाले आहे. गेल्याच आठवड्यात सलग पाच दिवस मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर हार्बर मार्गावरीलही वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तर आता ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळच्या वेळी लोकल विस्कळीत झाल्याने पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.