Thane: चिडलेल्या आरोपीने जिल्हा न्यायाधीशांवर फेकली चप्पल, शिवीगाळही केली; कोर्टाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit -file photo)

महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यात आरोपीकडून जिल्हा न्यायाधीशांवर चप्पल फेकल्याच्या आणि शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या दोन्ही आरोपाखाली एका 35 वर्षीय अंडरट्रायल व्यक्तीला दोन वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांनी, 5 मार्च रोजी आरोपी गणेश लक्ष्मण गायकवाडला आयपीसी कलम 353 (सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी शक्तीचा वापर) आणि 294 (आक्षेपार्ह कृत्ये किंवा सार्वजनिकरित्या आक्षेपार्ह शब्दांचा वापरा) अन्वये दोषी ठरविले.

सोमवारी ऑर्डर कॉपी उपलब्ध करुन देण्यात आली. अतिरिक्त सरकारी वकील एस. एम. दांडेकर यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी हा नवी मुंबई येथील मजूर असून ठाणे मध्यवर्ती कारागृहात अंडरट्रायल आहे. त्याला 28 जून, 2019 रोजी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. पुढे सुनावणी दरम्यान आरोपीने कोर्टाला सांगितले की कोर्टाने पुरविला गेलेला वकील सुनावणीला उपस्थित राहत नव्हता. यावर न्यायाधीशांनी आरोपीला सांगितले की न्यायालय त्याला आणखी एक वकील देईल आणि पुढच्या तारखेला सुनावणी होऊ शकेल.

यावर चिडलेल्या आरोपीने आपली एक चप्पल काढून न्यायाधीशांकडे फेकून मारली. तसेच त्याने घाणेरड्या भाषेत शिवीगाळही केली. यावर न्यायाधीशांनी आपल्या आदेशानुसार नमूद केले की, आरोपीने केलेला गुन्हा गंभीर आहे आणि तो कोणत्याही सहानुभूतीस पात्र नाही. (हेही वाचा: MP Mohan Delkar Suicide Case चा तपास SIT मार्फत होणार: गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती)

दरम्यान, याधीही मुंबईच्या कोर्टात चोरीच्या गुन्हाबाबत शिक्षा सुनावल्यावर एका आरोपीला इतका राग आला की त्याने न्यायाधीशांवर चप्पल फेकली होती. तरीही त्याचा राग शांत झाला नाही, म्हणून त्याने दुसरी चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित पोलिसांनी त्याला पकडले. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.