शिक्षकांनी 5 सप्टेंबर पर्यंत कोविड-19 लसीचा कमीत कमी 1 डोस घेणे गरजेचे; नाशिक पालिकेचे निर्देश
COVID-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सर्व शिक्षकांना 5 सप्टेंबरपर्यंत कोविड-19 लसीचा पहिला डोस (First Dose Of Covid-19 Vaccine) मिळणे गरजेचे असल्याचे निर्देश नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) शहारातील सर्व पालिका आणि खाजगी शाळांना दिले आहेत. यासंदर्भातील तपशील शाळांच्या मुख्यध्यापकांनी 5 सप्टेंबरनंतर द्यावा, असेही पालिकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, शाळा नियमितपणे सुरु कऱण्यासाठी 5 सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

महिनाभरापासून एकही रुग्ण न आढळलेल्या ग्रामीण भागात माध्यमिक शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु, पालिका हद्दीत अद्याप एकही शाळा सुरु झालेली नाही. त्यामुळे इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी लवकरात लवकर लसीकरण करावे, अशा सूचना पालिकेने यापूर्वीच दिल्या आहेत. (Covid-19 Vaccination: शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण 5 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश- आरोग्यमंत्री राजेश टोपे)

सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी 5 सप्टेंबरची डेटलाईन सेट करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी तोपर्यंत कमीत कमी लसीचा एक डोस घेणे गरजेचे असल्याचे पालिकेच्या शैक्षणिक अधिकारी सुनिता धनगर यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर शिक्षकांच्या लसीकरणाचा तपशील पाठवण्याचे निर्देशही शैक्षणिक संस्थांना दिले आहे. त्यामुळे 7 सप्टेंबरपर्यंत हे तपशील सादर होतील अशी अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्या.

लसीकरणासंदर्भातील या सूचना शाळांनी शिक्षकांना द्याव्यात. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत लसीचा एकही डोस घेतलेला नाही ते 5 सप्टेंबरपर्यंत कमीत कमी एक डोस घेतील, असे धनगर यांनी सांगितले. दरम्यान, शाळांकडून तपशील आल्यानंतरच शिक्षकांच्या लसीकरणाचा एकूण टक्का समजेल, असेही त्या म्हणाल्या.