शिक्षक भरतीची जाहिरात (संग्रहित-संपादित प्रतिमा)

राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षक भरती करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केली होती. त्यानंतर पवित्र पोर्टलवर (Pavitra Portal) याची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती. अखेर आता रखडलेल्या शिक्षक भरतीला मुहूर्त मिळाला आहे. येत्या 9 आॅगस्टला सायंकाळी 5 नंतर मुलाखतीशिवायच्या उमेदवारांची निवड यादी पवित्र पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे. सध्या राज्यात सरकारी आणि खासगी शाळांमध्ये तब्बल 25 लाख शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मात्र या टप्प्यात फक्त 12 हजार शिक्षकांची भरती होणार आहे.

शिक्षक भरतीची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी शासनाने पवित्र पोर्टल सुरु केले. या भरतीची माहिती आणि व्हिडिओ पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पोर्टलवर उमेवारांची यादी जाहीर करण्याबाबतच्या सूचना शुक्रवारी (दि.2) प्रसिद्ध झाल्या आहेत. 9 ऑगस्टच्या यादीनंतर पुढील यादी 16 ऑगस्टला जाहीर होणार आहे. यामध्ये मुलाखतीसहची निवड झालेल्या उमेदवारांची नावे असणार आहे. राज्यात शेवटची शिक्षक भरती 2008 साली झाली होती, त्यानंतर इतक्या वर्षांनी ही भरती होत असल्याने उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (हेही वाचा: शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध; पहा कोणत्या वर्गासाठी किती जागा राखीव)

दरम्यान, उमेदवारांना प्राधान्यक्रम निवडण्यासाठी 31 मे पर्यंतची मुदत देण्यात आली होती. यासाठी गेल्या सहा वर्षांमध्ये 5 सीईटी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. 6 लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, त्यातील 1 लाख 18 हजार उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर अभियोग्यता चाचणीही झाली. आता या सर्वांच्या आधारे पवित्र पोर्टलवी शिक्षकांची भरती होत आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षकांची थेट भरती होणार आहे. खासगी शाळांमध्ये मात्र निवडणूक प्रक्रियेद्वारे भरती पार पडली जाईल. खासगी शिक्षणसंस्थेमध्ये 1 जागेसाठी 10 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. 1 उमेदवार 10 ठिकाणी मुलाखत देऊ शकतो.