कोरोना व्हायरसचा विळखा संबंध जगाला बसला असून या संकटावर मात करण्यासाठी सर्वच देश झुंजत आहेत. भारत देशातही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. तर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्र राज्यात देखील कोरोना प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. तसंच नागरिकांना जागरुक करण्याचे कार्यही विविध माध्यमातून होत आहे. तरी देखील कोरोना व्हायरस संबंधित अनेक समज-गैरसमज लोकांच्या मनात आहेतच. यात भर पडते ती अफवांची. चुकीची माहिती, अफवा, फेक न्यूज यांचे सध्या पेव फुटल्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांच्या मनात भीती दाटते. त्यामुळे कोरोना व्हायरस संबंधित गैरसमज मनात न ठेवता नीट काळजी घेतल्यास आपण या विषाणूंचा प्रादुर्भाव टाळू शकतो. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विटच्या माध्यमातून खास माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरस कुठे, किती काळ टिकतो याची माहिती देण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी लिहिले की, "कोरोना विरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्यामुळे कोरोना विषाणू कुठे, किती काय तग धरुन राहतो, जाणून घेऊया." (कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्यासमवेत घरात बसून लोकांमध्ये केली जनजागृती; व्हिडिओ व्हायरल)
सुप्रिया सुळे ट्विट:
कोरोना व्हायरसबरोबरची लढाई आपणास जिंकायची आहे.आपण जाणून घेऊयात की हा विषाणू कुठे किती काळ तग धरुन राहतो हे जाणून घेऊ. #WarAgainstVirus#LetsFightCoronaTogether pic.twitter.com/W7UugHAqGL
— Supriya Sule (@supriya_sule) April 11, 2020
कोरोनाचा विषाणू हवेत- 3 तास, तांबे- 4 तास, कार्डबोर्ड- 24 तास, प्लॉस्टिक- 3 दिवस, स्टेनलेस स्टील- 2-3 दिवस तग धरुन राहतो असे यात म्हटले आहे. त्यामुळे सर्व पृष्ठभाग जंतुनाशकाने नियमित स्वच्छ करण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसचे महाराष्ट्रात तब्बल 1574 रुग्ण असून या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यात 110 नागरिकांचा बळी गेला आहे. तर 188 रुग्णांना प्रकृती सुधारल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे.