सर्वोच्च न्यायालयाने, नऊ जणांचा बळी घेणाऱ्या संतोष माने याला फाशीची शिक्षा रद्द ठरवत दिली जन्मठेपेची शिक्षा
सुप्रीम कोर्ट (Photo Credits: ANI)

25 जानेवारी 2012, हा दिवस पुणेकरांच्या आजही लक्षात असेल. यादिवशी माथेफिरू एसटी बसचालक संतोष माने याने भरधाव बस चालवून रस्त्यावरील तब्बल नऊ लोकांचा बळी घेतला होता. यामध्ये 38 जण जखमीही झाले होते. या संतोष मानेला आज सर्वोच्च न्यायालयाने फाशी देण्याचा निर्णय रद्द ठरवत, त्याऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संतोष माने यावर खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, चोरी आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे इत्यादी आरोप लावण्यात आले होते.

माने याने स्वारगेट बस स्थानकामधून बस चोरून, ती बेदरकारपणे चालवत 9 जणांचा बळी घेतला होता. याबाबत पुण्याच्या सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याबाबत त्याने उच्च कोर्टात अपील केले होते. उच्च न्यायालयाने पुन्हा या खटल्याचा निकाल देण्यात यावा अशी सूचना सत्र न्यायालयाला केली होती. त्यानंतरही सत्र न्यायालयाने माने याची फाशीची शिक्षा तशीच कायम ठेवली होती. या निकालानंतर संतोष माने याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. (हेही वाचा : विमा नसलेल्या वाहनांमुळे झालेल्या अपघातांमध्ये वाहन विकून मिळणार नुकसानभरपाई; सुप्रीम कोर्टाचा आदेश)

सर्वोच्च न्यायालयात आज खटल्याची सुनावणी पार पडली. यामध्ये माने हा मनोरुग्ण असून, त्याचे हे कृत्य वेडाच्या भरात झाले होते. त्यामुळे कलम 84 नुसार त्याला शिक्षा होऊ शकत नाही. असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र संतोष माने हा मनोरुग्ण असल्याचा कोणताही पुरावा सादर होऊ शकला नसल्याने कोर्टाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पूजा भाऊराव पाटील, राम ललीत शुक्ला, शुभांगी सूर्यकांत मोरे, पिंकेश खांडेलवार, अंकुश तिकोणे, अक्षय प्रमोद पिसे, मिलिंद पुरुषोत्तम गायकवाड, श्वेता धवल ओसवाल, व चांगदेव भांडवलकर अशी या घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांची नावे आहेत.