Air India Building Photo Credits: Wiki Commons

Air India Building: कर्जबाजारी झालेली आणि सध्या तोट्यात चाललेली एअर इंडिया(Air India) कंपनीची मुंबईतील मुख्य इमारत महाराष्ट्र सरकार खरेदी करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी त्यांनी 1400 करोड रुपयाची बोली लावली आहे. राज्य सरकारने ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिलेला भूखंड परत विकत घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबईतील मरिन ड्राईव्ह(Marine Drive) परिसरात गेली कित्येक वर्षे विशेष ओळख असलेली उत्तुंग अशी एअर इंडिया ची इमारत लवकरच राज्य सरकारच्या मालकीची होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून लावण्यात आलेली 1400 कोटी रुपयांची बोली ही एअर इंडियाच्या निर्धारित केलेल्या आरक्षित मूल्यापेक्षा 200 कोटींनी कमी असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) अनुक्रमे 1 हजार 375 कोटी आणि 1 हजार 200 कोटी रूपयांची बोली लावली होती.

दरम्यान, मागील आठवड्यात राज्याचे मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी लोहानी आणि नागरी उड्डान सचिव खरोला यांच्यात एक बैठक झाली. त्यात ठरल्याप्रमाणे हा व्यवहार झाल्यास जून महिन्याअखेरीस सरकार या इमारतीचा ताबा घेईल, असे राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याकडून सांगण्यात येत आहे.

मुंबई: जेट एअरवेज कर्मचार्‍यांचे आझाद मैदान येथे आंदोलन

एअर इंडियाचे मुख्यालय २०१३ साली दिल्लीत हलवण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतील एअर इंडियाच्या इमारतीतील २३ मजल्यापैकी १७ मजले एअर इंडियाने भाडेतत्त्वार दिले होते. त्यामुळे राज्य सरकारला या मजल्यांचा वापर करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. एअर इंडियाने आता नव्याने करार करु नये, अशी विनंतीही राज्य सरकारने केली आहे. सध्या मंत्रालयातील कामकाजाची जागा अपुरी पडत असून मंत्रालयातील काही विभागांची कार्यालये अन्य ठिकाणी कार्यरत असल्याचे मदान म्हणाले. तसेच यासाठी जास्त भाडे देण्यात येत असून याव्यतिरिक्त अन्य समस्याही सरकारला भेडसावत असल्याचे मदान यांनी बोलताना सांगितले.