
मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) पार्श्वभूमीवर पतंगप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले आहे. मात्र पतंग उडवताना चिनी आणि नायलॉन मांजाचा वापर करण्यांना थेट तुरुंगवास होऊ शकतो. असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नायलॉन मांजाचा वापर पक्षी, प्राणी आणि नागरिकांच्या जीवाला धोकादायक ठरु शकतो. म्हणूनच राज्य सरकारने या मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. परंतु, तरही छुप्या पद्धतीने याची विक्री, वापर आणि साठवणूक केली जाते. यामुळे बंदीचे उल्लंघन करुन अशा प्रकारच्या मांजाचा वापर करण्यांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येणार आहे.
राज्य सरकारने 1986 च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम 5 नुसार या मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. तरीही अशा मांजाची विक्री आणि वापर केला जातो. अशांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. नायलॉन किंवा चिनी मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हा गुन्हा जामीनपात्र असला तरी यासाठी एक महिना तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. तसंच या मांज्यामुळे कोणी जखमी झ्लायास इतर कलमांनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, ब्लर्ड फ्लू मुळे अनेक पक्षी दगावत आहेत. त्यामुळे मांजामुळे त्यांच्या जीवाचा धोका अधिक वाढू नये. तसंच मांजाच्या वापर माणसाच्याही जीवावर बेतू शकतो. त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. (Nagpur: पतंगाच्या मांजाने घेतला आणखी एकाचा जीव; नागपूर येथे गेल्या 10 दिवसांत तिसरा बळी)
विशेष म्हणजे महिलांच्या हळदी कुंकू समारंभासाठीही विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. महिलांचे हळदी कुंकूवाचे कार्यक्रम घरोघरी, संस्था, कार्यालयात तसंच राजकीय पक्षांच्या वतीने अनेक ठिकाणी होत असतात. अशावेळी महिला दागिने घालून घराबाहेर पडतात. अशावेळी चोरी होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे निर्देशही सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत.