प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

ST Bus Employees Strike:  गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. तर आजही संप कायम ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाकडून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन करुन सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरु ठेवल्याने आता त्यांच्या विरोधात थेट कारवाई करण्याचे आदेश एसटी महामंडळाकडून विभागीय नियंत्रकांना दिले आहेत. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीवरुन बडतर्फ करण्याचा इशारा दिला गेला आहे.(ST Workers Strike: चंद्रपूर येथे 14 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन; राज्य सरकारकडून कारवाईस सुरुवात)

एसटी महामंडळाकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय करुन संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना कायमचे घरी बसण्याची वेळ येणार असे दिसून येत आहे. राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील एसटीच्या आणखी 15 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली गेली. त्याचसोबत राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांचे करण्यात येणाऱ्या निलंबनाच्या निर्णयावर माघार घेणार नाही अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.(ST Employees Strike: गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्यांना पोलिसांनकडून अटक)

दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकाराने सहानुभूतीपूर्वक विचार केला आहे. तर विलिकरणाची मागणी सोडल्यास राज्य सरकारने अन्य सर्व मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. त्याचसोबत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप हा बेकायदेशीर असल्याचे ही परब यांनी म्हटले होते.