दहावी-बारावीच्या शिक्षकांच्या दृष्टीने दिलासादायक निर्णय यंदा निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयानुसार दहावी-बारावीच्या शिक्षकांवर आता निवडणूकीची कामे सोपण्यात येणार नाहीत. निवडणूकीच्या कामातून शिक्षकांना वगळले जावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. याच मागणीचा विचार करत दहावी, बारावीच्या बोर्डाचे पेपर तपासणाऱ्यांना निवडणूकांचे काम देवू नये, असे आदेश निवडणूक अधिकारी अ. ना. दळवी यांनी परिपत्रकातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशामुळे राज्यातील 50 हजार शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.
निवडणूकीच्या कामांचा परिणाम दहावी-बारावीच्या निकालांवर होऊ नये, म्हणून निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने 5 जूनपूर्वी बोर्डाचे निकाल लावण्यासाठी दहावी व बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी पत्र लिहून केली होती. बोर्डाने देखील तशी विनंती शिक्षण सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
शिक्षक संघटनांच्या पाठपुराव्यामुळे निवडणूक आयोगाने हा दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बोर्डाचे निकाल वेळेत लागण्यात कोणताही अडसर येणार नाही.