खुशखबर! दिवाळीनिमित्त चालविण्यात येणार रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या जादा फे-या, असे असेल वेळापत्रक
Tutari express (Photo credits: Instagram)

सध्या सणांचा हंगाम सुरु झाला असून नवरात्रीपाठोपाठ दसरा आणि दिवाळी हे सण लागूनच येतात. दिवाळी हा सण आपल्या कुटूंबासोबत साजरा करण्यासाठी कामानिमित्त आलेले अनेक चाकरमानी दिवाळीत आपल्या गावी जातात. यावेळी रेल्वेमुळे प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडू नये यासाठी रेल्वेने जादा एक्सप्रेस सुरु केल्या आहेत. दिवाळीनिमित्त गावी जाणा-या लोकांची संख्या जास्त असते. अशा वेळी गर्दीचे विभाजन झाल्याचा प्रवाशाचा रेल्वेप्रवास सुखकर होईल यासाठी ही या जादा रेल्वे सुरु करण्यात आल्या आहेत. लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) ते करमाळी (Karmali), पनवेल ते करमाळी, थिविम एक्सप्रेस (Thivim Express) यांच्या जादा फे-या चालविण्यात येणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनसहून 25 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान शुक्रवारी रात्री 1.10 वाजता करमाळीसाठी गाडी सुटेल. तर करमाळीहून दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस साठी ही गाडी सुटेल. त्याचबरोबर 25 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविमसाठी दर शुक्रवारी सकाळी 8.45 वाजता जादा एक्सप्रेस सुटणार आहे. ही गाडी थिविम येथे दुस-या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. तर 27 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर मध्ये थिविम येथून दर रविवारी दुपारी 2.30 वाजत लोकमान्य टिळक टर्मिनसासाठी विशेष गाडी सुटेल.

हेही वाचा- राजधानी, दुरांतो आणि शताब्दी एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी सुरु करण्यात येणार स्पेशल कोचेस, या कोचेसमधील असतील महिलांसाठी विशेष सोयी सुविधा

तसेच 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीमध्ये थिविमहून दर शनिवारी सकाळी 11.30 वाजता पनवेलसाठी गाडी सुटेल. त्याचबरोबर 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या दरम्यान पनवेलहून दर शनिवारी रात्री 11.55 मिनिटांनी थिविमसाठी गाडी सुटेल. ही गाडी थिविम येथे दुस-या दिवशी दुपारी 12 वाजता पोहोचेल.

या जादा एक्सप्रेससह लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एसी डबल डेकर गाडीला द्वितीय श्रेणीचा एक एसी डवा आणि तृतीय श्रेणीचे तीन एसी डबे जोडले जाणार आहेत. गाडी क्रमांक 11099 लोकमान्य टर्मिनस-मडगाव एसी डबल डेकर एक्सप्रेसला दर शनिवारी 11 जानेवारीपर्यंत जादा डबे जोडले जातील. तर गाडी क्रमांक 11085 लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एसी डबल डेकर एक्सप्रेसला दर सोमवारी आणि बुधवारी 8 जानेवारीपर्यंत जादा डबे जोडले जातील, असे सांगण्यात येत आहे.