अखेर मंत्रालयाच्या 'त्या' चर्चित पायऱ्या तोडल्या; जाणून घ्या काय आहे कारण
मंत्रालयाच्या तोडण्यात आलेल्या पायऱ्या (Photo Credit : Youtube)

2012 मध्ये मंत्रालयाला (Maharashtra Ministry) आग लागली होती. त्यानंतर साधारण 200 कोटी रुपये खर्चून मंत्रालयाचे संपूर्ण नुतनीकरण करण्यात आले होते. यामुळे मंत्रालयाला एकदम कॉर्पोरेट लूक प्राप्त झाला. त्यावेळी मंत्रालयाच्या दर्शनी भागात एशियाटिक लायब्ररीच्या धर्तीवर नवीन पायऱया बांधण्यात आल्या होत्या. मात्र शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने तोडून टाकल्या. सुरक्षेच्या कारणावरून पोलीस व अग्निशामक दलाने या पायऱ्यांवर आक्षेप घेतला होता, त्यामुळे या पायऱ्या तोडल्याचे सांगितले जात आहे.

या पायऱ्या मंत्रालयाच्या दक्षिण दिशेला होत्या, राजकीय प्रगतीला अडथळा म्हणून या पायऱ्यांचा वापर केला जात नव्हता. तसेच यामुळे सुरक्षेला अडथळा निर्माण होत आहे, असे अग्निशामक दलाने आधीच सांगितले होते. पुरातत्व विभागानेही या पायऱ्यांचा उपयोग नसल्याचे सांगितले होते. अखेर काल जनतेच्या कराच्या खर्चातून बांधण्यात आलेल्या या पायऱ्या तोडून टाकल्या. (हेही वाचा: बेरोजगार तरुणाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न)

आधी या दर्शनी भागातल्या पायऱयांवरून मंत्री व अधिकाऱयांना थेट मंत्रालयात प्रवेश देण्याची योजना होती. मात्र सध्या होत असलेल्या चर्चेनुसार या पायऱ्या दक्षिण दिशेला होत्या, जी दिशा प्रगतीत अडथळा ठरू शकते. या दिशेकडून मंत्रालयात प्रवेश नको म्हणून पश्चिम दिशेकडून व्हीव्हीआयपी नेत्यांसाठी प्रवेशद्वार करण्यात आले. दरम्यान या पायऱ्यांचा खर्च सरकारच्या तिजोरीतून करण्यात आला आहे. त्यामुळे हे पैसे कंत्राटदार, वास्तुविशारद यांच्याकडून वसुल करावा अशी मागणी मंत्रालय कर्मचारी महासंघाने केली आहे.