दक्षिण आफ्रिकेचा हापूस वाशीसह पुणे बाजारातही दाखल, कोकणच्या राजाप्रमाणे चव असल्यामुळे ग्राहकांची या आंब्याला पसंती
हापूस आंबा photo credits PTI File Photo

'कोकणचा राजा' म्हणून ओळख असलेल्या हापूस आंब्याची (Mango)  ख्याती जगभरात आहे. दरवर्षी लाखो टन हापूस आंबा देश-विदेशात निर्यात केला जातो. मात्र आता विदेशातील आंब्याची चव देखील महाराष्ट्राला चाखायला मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा मालावी जातीचा हापूस आंबा वाशी पाठोपाठ आता पुणे बाजारातही दाखल झाला आहे. मुंबई बाजारात या आंब्याला 500 ते 700 किलो भावाने विकला जात आहे. तर पुण्यात 1800 रुपये डझन या दराने विकला जात आहे.

या मालावी हापूस आंब्याची चव कोकणच्या हापूस आंब्यासारखी असून त्याचा रंगही सर्वसाधारण तसाच आहे. यामुळे ग्राहकही या आंब्याला पसंती दर्शवत आहे. आफ्रिकेत सध्या उन्हाळा सुरु असल्याने कोकणातील हापूस आंबा बाजारात येण्याआधी आफ्रिकेतील या हापूस आंब्याने मजल मारली आहे. या देशातून तब्बल 900 पेट्या हापूस आंबा APMC बाजारात दाखल झाल्या आहेत.

हेदेखील वाचा- कोकणचा राजा हापूस आंब्यांवर भौगोलिक मानांकनाची मोहर

ग्राहकांनी या आंब्याला पसंती दर्शविली असून यातील 800 पेट्यांची विक्री देखील झाली आहे. आफ्रिकेत हा हंगाम 15 ऑक्टोबर ते 15 डिसेंबरपर्यंत असतो. त्यामुळे हा आंबा डिसेंबरपर्यंत APMC बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल असे सांगण्यात येत आहे.

दक्षिण आफ्रिका खंडातील मालावी देशातील एका उद्योजकाने 'मालावी मँगोज' ही कंपनी स्थापन केली आहे. रत्नागिरीतील दापोली कृषी विद्यापीठातून हापूस आंब्याची कलमे तिकडे नेऊन त्याचे रोपण केले. तेथे सुमारे सातशे हेक्टरवर कलमांची अतिघन पद्धतीने लागवड केली़ दोन वर्षांपूर्वी आंब्याचे उत्पादन सुरू झाले़ त्यानंतर मालावीच्या हापूस आंब्याची देशात काही प्रमाणात निर्यात सुरू झाली.