Photo Credit - Facebook

Solapur Lok Sabha Election 2024: काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी सोलापूरची ओळख होती. मात्र, गेल्या 2 टर्मपासून भाजपने सोलापूर मतदारसंघात (Solapur Lok Sabha constituency) बाजी मारत त्यांचा खासदार जिंकला आहे. दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रसकडून जोरदार ताकद या मतदारसंघात लावण्यात आली आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून दोन विद्यमान तरुण आमदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. महायुतीकडून भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) तर महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.(हेही वाचा:Nagpur Lok Sabha Election 2024: नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी विजयाची करणार हॅट्रिक; विकास ठाकरेंपुढे मोठं आव्हान )

प्रणिती शिंदे-

प्रणिती शिंदे-प्रणिती शिंदे यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी झाला. बीए, एलएलबीचे शिक्षण त्यांनी घेतले आहे. त्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. उच्चशिक्षित तरुण आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. वयाच्या 28 व्या वर्षी त्या पहिल्यांदा सोलापूर शहर-मध्य या विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. 2009 पासून त्या सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. पहिल्या निवडणुकीत त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार नरसय्या आडम मास्तर यांचा पराभव केला होता.

प्रणिती शिंदे यांची एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून राज्यात ओळख आहे. दांडगा जनसंपर्क, मनमिळावू पणा, प्रसंगी धाडसी आणि आक्रमक होण्याचा स्वभाव, प्रभावी वत्कृत्व या गुणांमुळे प्रणिती यांनी वडिलांप्रमाणेच अल्पावधीत स्‍वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. प्रणिती शिंदे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीच्या आमंत्रित सदस्य आहेत.

राम सातपुते-

राम सातपुते हे भाजपचे माळशिरसचे विद्यमान आमदार आहेत. त्याशिवाय, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले. 36 वर्षीय राम सातपुते हे मूळचे बीड येथील आहेत. वडील ऊसतोड कामगार होते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले. तेव्हापासून त्यांनी सक्रियपणे विद्यार्थी संघटनेचे काम केले. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना माळशिरस राखीव मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत राम सातपुते यांनी राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांचा 2702 मतांनी पराभव करत विजय मिळवला होता