मुंबईच्या (Mumbai) कुलाब्यातील एका ज्वेलर्स दुकानाच्या मालकाने मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या लेखिका शोभा देशपांडे (Shobha Deshpande) यांनी दुकानाबाहेर आंदोलन पुकारले होते. तब्बल 18 तासानंतर त्यांच्या लढ्याला यश आले आहे. शोभा देशपांडे यांनी घेतलेल्या या ठाम भूमिकेनंतर शिवसेना (Shiv Sena) आणि मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांच्या आंदोलनाला पांठिबा दिला होता. त्यानंतर, दुकानदाराने शोभा देशपांडे यांची मराठीतून माफी मागितली. मात्र, याप्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शोभा देशपांडे यांच्या भुमिकेला आपला विरोध दर्शवला आहे. तसेच शिवसेना मराठी भाषेचे राजकारण करत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.
"फक्त मराठी बोलण्याची सक्ती हे संविधान विरोधी आहे. शिवसेने उत्तर आणि दक्षिण भारती विंग आहेत. त्या सर्वांनाच मराठी बोलता येते का? असा प्रश्न रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणे सक्तीचे करता येणार नाही. शोभा देशपांडे आणि शिवसेनच्या भुमिकेला माझा विरोध आहे. शिवसेना मराठी भाषेचे राजकारण करत आहे", असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Bhaskar Jadhav Abusing: शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी रागाच्या भरात वयोवृद्धाला केली शिवीगाळ, रत्नागिरीतील ग्रामदेवेतेच्या मंदिरातील व्हिडिओ व्हायरल
नेमके प्रकरण काय आहे?
कुलाबा परिसरातील महावीर ज्वेलर्स या दुकानातील कर्मचारी हिंदीत बोलत होते. त्यावेळी शोभा देशपांडे यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना मराठीत बोलण्याचा आग्रह केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्यास नकार दिला. तसेच त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले, असा आरोप शोभा देशपांडे यांनी केला आहे. दुकानाचा परवाना मागितल्यावर ज्वेलर्सच्या मालकाने अरेरावीची भाषा करत त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे शोभा देशपांडे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाने मराठी भाषेसाठी अग्रेसर भुमिका घेतली आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठी या विषयांवरून मनसे कार्यकर्त्यांनी अनेक अंदोलने केली आहेत.