वॉर्डनकडून विनयभंग; वसतिगृहाच्या खोलीत मुलीला चक्क नग्न केले
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

एकीकडे #MeToo मोहिमेअंतर्गत स्वतःवरील झालेल्या अन्यायाविरुद्ध महिला आवाज उठवत आहेत, तर दुसरीकडे महिलाच महिलांवरील अत्याचाराला कारणीभूत ठरत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे, एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू कॅम्पस येथील वसतिगृहात. बिनबाह्यांचे कपडे घातले म्हणून महिला वॉर्डनने मुलीला चक्क नग्न केल्याचा प्रकार वसतिगृहात घडला आहे. या मुलीने वॉर्डनने विनयभंग केल्याची तक्रार केल्यानंतर वॉर्डनला निलंबित करण्यात आले आहे.

वसतिगृहाच्या परिसरात बिन बाह्यांचे कपडे घालण्यास मनाई आहे, मात्र या अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांत शिकत असलेल्या या मुलीने स्कीन इंन्फेशनमुळे अंगावर रॅशेस आल्याने स्लिव्हलेस कपडे घातले होते. हे पाहून चिडलेल्या वॉर्डनने तिला एका खोलीत नेवून शिवीगाळ करायला सुरुवात केली, आणि नेमका कुठे त्रास होतो ते दाखविण्यासाठी अंगावरील कपडे उतरवून संपूर्ण नग्न केले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी वॉर्डनवर कारवाई करण्याची मागणी करत, वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ रविवारी आंदोलन केले. एसएनडीटी विद्यापीठ प्रशासनाने या वार्डनला चार दिवस निलंबित केले आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी संध्याकाळी आंदोलन मागे घेतले.

या प्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी चौकशीसाठी विशेष समिती नियुक्त केली जाईल. या समितीच्या अहवालानुसार दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी दिली आहे.