सायन उड्डाणपूल एप्रिल 2019 पर्यंत वाहतुकीसाठी बंद
सायन उड्डाणपूल (Photo Credits: Twitter/@yogendra73)

मुंबईत वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा सायन उड्डाणपूल 1 डिसेंबरपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिलेल्या माहितीनुसार, सायन उड्डाणपूल चार महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 1 डिसेंबरपासून पुढील चार महिने हा पूल वाहतूकीसाठी बंद राहील. हा पूल बीकेसी, धारावी, कुर्ला, माटुंगा, चेंबूर, नवी मुंबई, पनवेल आणि पुणे या मार्गांना जोडला जात होता.

यापूर्वी सायन उड्डाणपूलाचे ऑडिट करण्यात आले होते. त्यात पूलाची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे दिसून आले. त्यामुळे उड्डाणपूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर पूल दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासनही मंडळाने दिले आहे. पण त्याचबरोबर पूलाचे काम पूर्ण होण्यास एप्रिल महिना उजाडेल, असेही सांगण्यात आले आहे.

पूल बंद राहिल्यामुळे वाहतुकी कोंडीला सामोरे जावे लागते. म्हणूनच पर्यायी मार्ग शोधले जात आहेत. लवकरच त्या पर्यायी मार्गांची घोषणा करण्यात येईल, असे मंडळाने सांगितले आहे.