महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार सिद्धिविनायक ट्रस्ट
Siddhivinayak temple and Indian Army (photo Credits: File Photo)

अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले मुंबईतील ठिकाण म्हणजे प्रभादेवीमधील सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple). या मंदिरात रोज हजारो भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येतात आणि भक्तिभावाने जमेल तितके दान श्रींचरणी अर्पण करतात. मग हा जमा झालेला निधी सिद्धिविनायक ट्रस्ट महाराष्ट्रातील गरजूंसाठी खर्च करतात. मुलांचे शिक्षण, पूरग्रस्त, अनाथ आश्रम आणि एखाद्या गंभीर आजारावरील शस्त्रक्रियेसाठी खर्च केला जातो. नुकतीच या ट्रस्टने धरणफुटीत वाहून गेलेले तिवरे गाव दत्तक घेऊन एक स्तुत्यप्रिय असा निर्णय घेतला. त्यातच अजून एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या मुलांचा 'केजी टू पीजी' पर्यंतचा शिक्षणाचा खर्च करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

नुकत्याच झालेल्या सिद्धिविनायक मंडळाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे या मंडळाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले. या बरोबरच युद्धात जायबंदी झालेल्या जवानांसाठी पुण्यात कार्य करणाऱ्या 'क्वीन मेरी' या संस्थेला 25 लाखांचा धनादेशही दिला.

हेही वाचा- सिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार तिवरे गाव, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव: आदेश बांदेकर

आज देशभरात साजरा होणा-या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला. शहीद जवानांच्या मुलांच्या 'केजी टू पीजी' शिक्षणाचा खर्च उचलण्याचा हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

रत्नागिरीच्या (Ratnagiri) चिपळूण (Chiplun) तालुक्यातील तिवरे (Tivre Village) गावावर काही दिवसांपूर्वी धरणफुटीच्या रूपात मोठं संकट कोसळलं होतं. यानंतर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडे (Siddhivinayak Mandir Trust) गावाला दत्तक घेण्याची विनंती केली होती, ज्यानुसार आता मंदिर न्यासाकडून गावाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवून देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी ABP माझाशी बोलताना दिली होती.