Siddhivinayak Temple Trust distributed food, water to police (Photo Credits: ANI)

भारत देशावर कोरोना व्हायरसचे महाभयंकर संकट घोंगावत आहे. या संकाटाशी दोन हात करण्यासाठी संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. 14 एप्रिलपर्यंत देश लॉकडाऊन राहणार असून या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात सारे व्यवहार बंद असले तरी पोलिस मात्र अहोरात्र मेहनत घेत आहे. या बिकट परिस्थितीत पोलिसांवरील ताण अधिकच वाढला आहे. नागरिकांच्या सेवेसाठी या गंभीर परिस्थितीतही जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलिसांसाठी काल सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे जेवण आणि पाण्याची सोय करण्यात आली.

मुंबई शहरातील लॉकडाऊनच्या परिस्थितीत रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या पोलिस आणि ट्रॅफिक पोलिसांसाठी जेवण आणि पाण्याच्या बाटल्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे पुरवण्यात आल्या. सिद्धिविनायक ट्रस्ट नेहमीच अडीअडचणीच्या काळात समाजिक भान दाखवत असते. यंदाही तेच अनुभवायला मिळाले. (मुंबई पोलिस नागरिकांच्या वर्दळीवर लक्ष ठेवण्यासाठी घेणार ड्रोनची मदत)

ANI Tweet:

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले आहे. मात्र तरी देखील रस्त्यावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे साहजिकच पोलिसांवरील कामाचा ताण अधिक वाढतो. सध्याच्या बिकट परिस्थितीतही आपल्यासाठी काम करणारे पोलिस त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा पुरवणारा डॉक्टरांसह इतर कर्मचारी वर्ग यांच्यावरील ताण विनाकारण वाढू नये, म्हणून सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. तसंच त्यामुळे आपण आणि आपले कुटुंबिय देखील सुरक्षित राहतील.