सध्या देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरु आहे. या पावसाळ्यात समुद्रावर, नदी काठी, तलावाजवळ, उंच कड्यावर दुर्घटना घडण्याचे प्रकार सर्रास घडतात. आता महाराष्ट्रातील सांगली (Sangli) जिल्ह्यात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा ओमानमध्ये (Oman) समुद्रात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. समुद्रात बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी वडिलांनी समुद्रात उडी मारली होती, मात्र तेही बुडाले. अशा प्रकारे दोन मुले आणि वडिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या लोकांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे, मात्र तो याच घटनेचा आहे की नाही याबाबत पुष्टी झालेली नाही. परंतु या व्हिडीओचा आधार घेऊन अनेक माध्यमांनी वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना रविवारी दुपारी घडली. या भीषण अपघातात सांगलीतील जत गावातील रहिवासी शशिकांत म्हामाणे, त्यांची 9 वर्षांची मुलगी श्रुती आणि 6 वर्षाचा मुलगा श्रेयस यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर असलेले शशिकांत हे दुबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होते. त्यांची पत्नी सारिका देखील त्यांच्यासोबत दुबईत राहत होती.
Watch: A family is swept away by a giant wave on #Oman's Mughsail beach after eight members reportedly crossed the beach's boundary fence.https://t.co/2KHqOMobdD pic.twitter.com/w2auuYfUku
— Al Arabiya English (@AlArabiya_Eng) July 12, 2022
रविवारी शशिकांत आपले कुटुंब आणि काही मित्रांसह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ओमानला गेले होते. शशिकांत ओमानमधील सलल्हा नावाच्या ठिकाणी आपले कुटुंब आणि मित्रांसह समुद्रातून येणाऱ्या उंच लाटांचा आनंद घेत होते. यादरम्यान एक मोठी लाट आली, त्यात शशिकांतची दोन्ही मुले आणि इतर अनेक जण वाहत समुद्रात गेले. आपली मुले बुडत असल्याचे पाहून शशिकांत यांनीही समुद्रात उडी मारली. मात्र काही वेळाने शशिकांतचाही बुडून मृत्यू झाला. ओमानमधील या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा: Heavy Rain In Nagpur: नागपूरमध्ये मुसळधार पाऊस, पाहा व्हिडिओ)
आता समुद्रात बुडालेले शशिकांत आणि त्यांच्या मुलांचा शोध सुरू आहे. रॉयल ओमान पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ओमान नागरी संरक्षण आणि रुग्णवाहिका प्राधिकरणाने रविवारी सांगितले की, लोकांनी मुगसेल बीचवर सुरक्षेची लाईन पार केली होती. यावेळी लाटेचा तडाखा बसल्याने आठ जण खाली पडले होते. अपघातानंतर काही वेळातच यातील तिघांना वाचवण्यात यश आले, मात्र अजूनही 5 जणांचा शोध सुरु आहे. लोक बेपत्ता झाल्याच्या वाढत्या अहवालानंतर, अस्थिर हवामानामुळे ओमानने सल्तनतमधील सर्व पर्यटन स्थळे तात्पुरती बंद केली आहेत.